भाजप विरोधी आघाडीसाठी पवार-ठाकरेंच्या पुढाकाराची ममतांची इच्छा
सध्या राजकीय वातावरणात अनेक बदल पहायला मिळत आहेत. अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आता सर्व पक्षातील दिग्गजांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आता ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी पहिलं पाऊल महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य कर्नाटकात ठेवलं आहे. दरम्यान शरद पवार बेंगळुरू येथे पोहचले असता त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले आहे. पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान त्यांनी देशपातळीवर भाजप विरोधी आघाडी उभारण्याबाबत खूप मोठे विधान केले आहे यावेळी ते म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी आघाडी उभारण्यासाठी लवकरच पावले टाकली जातील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. भाजपच्या विरोधातील पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेक नेत्यांची आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर आम्हाला तसे लेखी कळवले आहे. याचा पुढाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. इतर नेत्यांशी बोलून आम्ही अंतिम निर्णय घेऊ. मात्र याची कोणतीही तारीख अद्याप ठरलेली नाही’, असे पवार यांनी स्पष्ट केलं केलं आहे.