कोल्हापूर : शिवछत्रपती-ताराराणी रथोत्सव उत्साहात
‘छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी ताराराणी, राजर्षी शाहूंचा’ अखंड जयघोष, छत्रपतींच्या मानकर्यांसह पारंपरिक लवाजमा, रणहलगी-तुतारी, ढोल-ताशा, धनगरी ढोल पथकांचा दणदणाट, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, ऐतिहासिक वेशभूषा केलेले बालचमू, यासह नेत्रदीपक आतषबाजी, सप्तरंगी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या अशा उत्साही वातावरणात सोमवारी शिवछत्रपती व ताराराणी यांचा रथोत्सव झाला.
छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या रथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या रथोत्सवाला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्षाची जोड असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या ‘राजर्षी शाहू कृतज्ञता’ वर्षाची सुरुवात या दिवसाच्या निमित्ताने करण्यात आली.
जुना राजवाड्यातील भवानी मंडपात प्रथेप्रमाणे शाहू महाराज, खा. संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे यांच्या हस्ते रथाचे पूजन झाले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुना राजवाडा, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वाररोड, गुजरी, भाऊसिंगजीरोड मार्गे जुना राजवाडा असा रथोत्सवाच्या नगरप्रदक्षिणेचा मार्ग होता. संपूर्ण मार्गावर विविध तालीम संस्था-तरुण मंडळे, शिव-शाहूप्रेमींच्या वतीने रथाचे भव्य स्वागत करण्यात आले.
महिलांनी औक्षण केले. शिवछत्रपती, शंभूराजे, ताराराणी, राजर्षी शाहू यांचे पुतळे व प्रतिमा ठिकठिकाणी लावण्यात आल्या होत्या. पुष्पवृष्टी, सप्तरंगी आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, नेत्रदीपक आतषबाजी, एलईडी स्क्रीन अशा उत्साही वातावरणात रथाचे स्वागत करण्यात आले.
लोकोत्सवात विविध तालीम संस्थांचा सहभाग
रथोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे यात छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टसोबतच बालगोपाल तालीम, राजर्षी शाहू तरुण मंडळ, मावळा कोल्हापूर, शिवशक्ती प्रतिष्ठान, हिंदवी स्पोर्टस्, रंकोबा देवालय गल्ली गँग, बिनखांबी तरुण मंडळ, राजर्षी शाहू मॅरेथॉन, आझाद गल्ली तरुण मंडळ, शिवदिग्विजय प्रतिष्ठान, विठ्ठलाई बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, करवीर नाद व महालक्ष्मी ढोल ताशा पथक, संभाजीराजे फौंडेशन, श्री महालक्ष्मी फेरीवाला संघटना, श्री अंबाबाई भक्त समिती, पतीत पावन संघटना, महाद्वार व्यापारी व रहिवासी संघ, महालक्ष्मी भक्त मंडळ, गुजरी मित्र मंडळ, सराफ संघ, यासह विविध समाज संस्था-संघटनांनी रथोत्सवासाठी सेवा दिली.
राजर्षी शाहूंनी सुरू केला रथोत्सव l
दख्खनचा राजा जोतिबा यात्रेसाठी लाखोच्या संख्येने जोतिबा डोंगरावर येणारे भाविक कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठीही आवर्जून येतात. यामुळे या लोकांना रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्या शिवछत्रपती व स्वराज्य रक्षिका रणरागिणी ताराराणी यांच्या स्फूर्तिदायी इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने इसवि सन 1914 पासून राजर्षी शाहूंनी या रथोत्सवाची सुरुवात केली. रथोत्सव सुरू करण्याचा आदेश
19 जानेवारी 1914 रोजी दिला होता. याबाबतीची माहिती देणारा फलक श्री बिनखांबी गणेश मित्र मंडळ व राजर्षी शाहू मॅरेथॉनच्या वतीने बिनखांबी गणेश मंदिराजवळ लावण्यात आला आहे.