कोल्हापूर मुक्काम टाळण्यासाठी सदावर्तेंची न्यायालयात धाव
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबई आणि साताऱ्याच्या पोलिस कोठडीतील मुक्कामानंतर आता त्यांचा पुढचा मुक्काम कोल्हापुरात असणार असल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस स्थानकातील पथक सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले असल्याचा माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नव्हता. दरम्यान, कोल्हापूर मुक्काम टाळण्यासाठी सदावर्तेंची न्यायालयात धाव घेतली असून त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडून अर्ज दाखल करण्यात आला असून आज दुपारी यावर सुनावणी होणार आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर अॅड. सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांना ताब्यात घेत अटक केली होती. यानंतर त्यांच्याविरोधात सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून तक्रार दाखल झाली होती. सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील (कोल्हापूर) यांनी ॲड. सदावर्ते यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्या तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याचा सदावर्तेंचा प्रयत्न सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करणारा आहे, असेही दिलीप पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सदावर्ते यांना आठवड्यापूर्वी सातारा पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आदेश झाला होता. सायंकाळी त्यांना मुंबईतील कारागृहात हलवण्यात आले. दरम्यान, ॲडव्होकेट सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे विशेष पथक रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.