राम मंदिरासाठी पहिली चांदीची वीट ‘धर्मवीर आनंद दिघें’नी पाठवली होती
जनसामान्यांचा नेताच नाही तर आधार म्हणून ओळख असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे ‘लोककारणी’ म्हणजे आनंद दिघे. यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ असं या चित्रपटाचं नाव असून प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या राम मंदिरासाठीच्या योगदानावर जाणून घेऊया.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिलान्यास हे चांदीच्या विटेनं करण्यात येणार होतं. त्यासाठी 33 वर्षापूर्वी सर्वात पहिली चांदीची विट देणारे ‘ठाणे’ शहर होते. आता याच्या आठवणी जागवल्या जाताहेत. किंबहुना, शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या माध्यमातून ही संकल्पना मांडल्या गेलेल्या आठवणीही जुनेजाणते कार्यकर्ते आजही सांगतात.
पाच ऑगस्टला अयोध्या नगरीत श्रीराम मंदिराचा शिलान्यास होणार होता. त्यासाठी चांदीची विट चांगलीच चर्चेत आली होती. मात्र, एकीकडे हे कवित्व सुरू असले तरी तब्बल 33 वर्षापूर्वी म्हणजेच 1987 साली पहिली चांदीची विट ठाणे शहरातून अयोध्येला रवाना करण्यात आली होती. शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख दिघे यांनीच लोकवर्गणीतून बनवून घेतलेली चांदीची वीट पाठवली होती. आनंद दिघे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जायचे. त्याकाळी शिवसेना राम मंदिराच्या निर्माणासाठी फारच अग्रेसर भूमिकेत असायची.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर, राममंदिर निर्माणासाठी उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे कुणाच्याही ध्यानीमनी नसताना किंबहुना, बाबरी मशिद पाडण्याच्या पाच वर्षे आधीच 1987 साली आनंद दिघे यांनी, अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी पहिली चांदीची विट बनवून घेतली होती. सव्वाकिलो वजनाची ही चांदीची विट टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात पूजनासाठी आणण्यात आली होती. त्या विटेवरदेखील “जय श्रीराम” असे लिहिण्यात आलं होतं.
टेंभी नाका येथील कन्हैयाभाई रावल उर्फ कनुभाई या सराफाकडून ही वीट आनंद दिघे यांनी बनवून घेतली होती. यावेळी सुरक्षेचा विचार आणि भाविकांचा प्रतिसाद पाहून याच विटेसारखी आणखी एक प्रतिकृती बनविण्यात आली. यामध्ये चंदनाचे लाकूड वापरून त्यावर चांदीचा पत्रा बसवण्यात आला होता. खरी चांदीची वीट ही पूजा करून करसेवकांच्या मार्फत अयोध्येला पाठवण्यात आली. तर त्या विटेची प्रतिकृती ठाण्यातील टेंभीनाका येथे पूजन करून सात दिवस ठेवण्यात आली होती. या विटेचे पूजन गजानन पट्टेकर महाराज यांच्याहस्ते करण्यात आले होते.
दिघे रामभक्त होते. त्यांच्या आवाहनानंतर ठाणेकरांनी स्वतःच्या घरातील चांदी दिली होती. तसेच काहींनी पैशांच्या स्वरूपात देखील मदत केली होती. त्यानंतर, सराफांनी जुनी चांदी वितळवून जय श्रीराम अक्षरे कोरलेली चांदीची वीट बनवली होती. त्याचबरोबर, विहीपकडुन आणलेली 51 फूट उंचीची योद्धा श्रीराम ही भव्य कटआऊट केवळ ठाण्यातील टेंभी नाक्यावरच झळकत होती.