…तर होणार कठोर कारवाई; मार्गदर्शक सूचना आज होणार जारी
धार्मिक स्थळांवर (religious places) विनापरवानगी भोंगे लावले गेले तसेच निश्चित करून दिलेली आवाजाची (डेसिबल) मर्यादा ओलांडली गेली तर राज्यात कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. भोंग्यांबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले गेले नाहीत तर अशा प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असे आधीच जाहीर केले असून त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच, काही ठिकाणी तणावाच्या घटना घडत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी गृहमंत्री वळसे पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशी या विषयावर बैठकीत चर्चा केली. भोंग्यांच्या मुद्द्यावर समाजात कोणीही तेढ निर्माण करणार असेल तर कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार धार्मिक स्थळांवर (religious places) विनापरवानगी भोंगे बसविल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या भोंग्यांच्या आवाजाची मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेली आहे. ती मर्यादा पाळणेही बंधनकारक असेल आणि मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत भोंगे सुरू ठेवता येणार नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.
मार्गदर्शक सूचनांवर आज होणार शिक्कामोर्तब –
या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यात मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निश्चित करण्यात येतील व मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने त्या जारी करण्यात येतील. भोंग्यांवरून तेढ निर्माण करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल.
– दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
‘त्या’ सभांवर बंदी घाला : पटोले –
– केंद्र सरकार आपले अपयश झाकण्यासाठी राज्यात धार्मिक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून, अशी तेढ पसरविणाऱ्या सभांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.
– इंधनदरवाढ, महागाईवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करून वातावरण बिघडवण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे. राज्यातील सामाजिक एकोपा, शांतता, सौहार्द संपवण्याचा जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी हिंदू आहे आणि दररोज हनुमान चालिसा म्हणतो; पण त्याचा कधी गाजावाजा करत नाही, अशी प्रतिक्रिया पटोले माध्यमांशी बोलताना दिली.
– मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना याआधी सुपारीबाज म्हटले होते. आता राज यांनी कोणाची सुपारी घेतली आहे हे फडणवीसच सांगू शकतील.