राज्यात भाजपचं सरकार असताना भोंगे का उतरवले नाहीत

मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरू आहेत. हे भोंगे हटवण्याची मागणी करत मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर पोलीस प्रशासनाला भोंगे हटवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे. तसंच भाजपच्या विविध नेत्यांकडूनही या मागणीचं जोरदार समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Pravin Togadia News) यांनी मात्र भाजप नेत्यांना अडचणीत आणणारा प्रश्न विचारत टीका केली आहे.
‘महाराष्ट्रात तुमचं सरकार असताना तर तुम्ही भोंगे हटवले नाहीत. मात्र आता राज्यात दुसऱ्या कोणाचं तरी सरकार आल्यानंतर तुम्ही भोंगे हटवण्याची मागणी करत असाल तर चांगली गोष्ट आहे,’ असा टोला प्रवीण तोगडिया यांनी लगावला आहे. तसंच हे भोंगे उतरवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्याची विनंती भाजप नेत्यांनी केंद्र सरकारकडे करावी म्हणजे हा प्रश्न कायमचा संपून जाईल, असंही तोगडिया यांनी म्हटलं आहे.
भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रवीण तोगडिया यांनी अनेक वर्ष काम पाहिलं आहे. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांचा संघटनेतील इतर नेत्यांशी वाद झाला आणि तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली. त्यानंतर तोगडिया यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. अशातच आता पुन्हा भोंग्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण तापू लागल्यानंतर राज्य सरकारनेही या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या भोंग्यांबाबत लवकरच नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *