तोंडाशी संबंधित दोन लक्षणं दिसली तर तातडीने टेस्ट करून घ्या..
डायबेटिस (Diabetes) अर्थात मधुमेह हा गुंतागुंतीचा आणि अन्य गंभीर आजारांना कारणीभूत ठरणारा विकार आहे. गेल्या काही वर्षात डायबेटिसच्या रुग्णसंख्येत सातत्यानं मोठी वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, कौटुंबिक पार्श्वभूमी, अनुवंशिकता, ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आदी कारणांमुळे डायबेटिस होण्याची शक्यता असते. डायबेटिस हा चयापचाय क्रियेशी निगडीत आजार मानला जातो. या क्रियेत काही कारणांमुळे बिघाड निर्माण झाल्यास या आजाराची लक्षणं दिसू लागतात.
डायबेटिसवर ठोस असे उपचार नसले तरी औषधं (Medicine) आणि जीवनशैलीत (Lifestyle) सकारात्मक बदल केल्यास तो नियंत्रणात ठेवता येतो. डायबेटिसला ‘सायलेंट किलर’ असं देखील म्हटलं जातं.
डायबेटिसच्या रुग्णांनी वेळेवर ब्लड शुगर (Blood Sugar) नियंत्रणात न आणल्यास प्रसंगी मृत्यूदेखील ओढावतो. डायबेटिसच्या रुग्णांमध्ये या आजाराच्या अनुषंगानं विविध लक्षणं दिसून येतात. परंतु, डायबेटिसची लक्षणं ही तोंडातही (Mouth) दिसून येतात, असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे. `आज तक`ने याविषयीची माहिती दिली आहे.
डायबेटिसचे प्रकार
डायबेटिसचे सर्वसामान्यपणे डायबेटिस टाइप -1 (Diabetes Type-1) आणि डायबेटिस टाइप -2 (Diabetes Type-2) असे दोन प्रकार आहेत. डायबेटिस असलेल्या प्रौढांपैकी 10 टक्के लोक हे डायबेटिस टाइप -1 ने ग्रस्त आहे. याची लक्षणं डायबेटिस टाइप-2 पेक्षा वेगळी असतात. डायबेटिस टाइप -1 मध्ये शरीरातली इम्यून सिस्टीम इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करू लागते. परिणामी, डायबेटिस टाइप -1 असलेल्या रुग्णाला नियमित इंजेक्शनद्वारे इन्शुलिन शरीरात टोचून घ्यावं लागतं.
डायबेटिस टाइप-2 मध्ये शरीर इन्शुलिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात करु शकत नाही किंवा पेशी त्याला योग्य प्रतिसाद देऊ शकत नाहीत. डायबेटिस टाइप -1 लठ्ठपणाशी निगडित असतो. त्यामुळे यावर उपचार करणं अशक्य असतं. या उलट डायबेटिस टाइप-2ची स्थिती असते. हा डायबेटिस असलेल्या व्यक्तींना आपलं वजन नियंत्रणात ठेवावं लागतं. तसंच आहाराविषयी विशेष काळजी घ्यावी लागते.
प्राथमिक लक्षणं
डायबेटिसमुळे (Diabetes) हाय ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हृदयविकार, मज्जातंतूचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे डायबेटिस हा एकप्रकारे जीवघेणा आजारही म्हणता येईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2019 मध्ये डायबेटिस हा मृत्यूचे नववे प्रमुख कारण होता. त्यामुळे डायबेटिसची लक्षणं दिसताच, तातडीनं तपासणी करणं आणि निदानपश्चात उपचार घेणं आवश्यक आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. डायबेटिसच्या रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे काही लक्षणं अगदी प्राथमिक टप्प्यात दिसून येतात. यात खूप तहान लागणं, वारंवार युरिनला होणं, थकवा जाणवणं, आजारी असल्यासारखं वाटणं, दृष्टी अंधूक होणं, अचानक वजन कमी होणं, तोंडात, घशाला किंवा शरीराच्या अन्य भागात फोड येणं आणि जखम भरून येण्यास उशीर लागणं यांचा समावेश आहे.
यापैकी कोणतंही लक्षण जाणवत असल्यास डायबेटिसचे संकेत समजून तपासणी करुन घेणं आवश्यक आहे.
तोंडाशी संबंधित या लक्षणांकडे ठेवा नजर
आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या मते, व्यक्तीच्या तोंडातही डायबेटिसची दोन लक्षणं दिसून येतात. पण ही लक्षणं लोकांच्या सहजासहजी लक्षात न आल्यामुळे धोका वाढतो. तोंडाला वारंवार कोरड पडणं (Dry Mouth) आणि तोंडातून गोडसर किंवा फळांचा वास येणं हीदेखील डायबेटिसची लक्षणं आहेत. ही लक्षणं हाय ब्लड प्रेशर किंवा हायपोग्लायसेमियाशी (Hypoglycemia) संबंधित असतात. त्यामुळे या लक्षणांकडेदेखील लक्ष देत वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि औषधोपचार सुरू करावेत.