पन्हाळा उड्डाणपूल प्रस्ताव धूळ खात
पन्हाळगडाच्या प्रवेशद्वारातील रस्ता वारंवार खचत असल्याने बांधण्यात येणार्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिझाईन सर्कलकडे धूळखात पडून आहे. या विभागाकडून गेले वर्षभर याबाबत काहीच निर्णय न झाल्याने उड्डाणपूल (Flyover) मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
पन्हाळा वाघबीळ टोलनाका ते बुधवार पेठ एक किलोमीटरचा उड्डाणपूल
पन्हाळा रस्ता खचल्याने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उड्डाणपुलाचा प्रस्ताव समोर आला. पन्हाळा वाघबीळ टोलनाका ते बुधवार पेठ हा सुमारे एक किलोमीटर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. यासाठी सार्वजनिक बांंधकाम विभागाने सर्वेक्षण करून सविस्तर प्रस्ताव पाठविला आहे. तसेच उड्डाणपुलासाठी आवश्यक भूसंपादनासाठी वन विभाग आणि पुरातत्त्व खात्याशी सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रव्यवहार सुरू केला आहे.
पन्हाळगडाच्या प्रवेशद्वारापाशी वारंवार दरडी कोसळत असल्याने कायमस्वरूपी मार्ग म्हणून या ठिकाणी एक कि.मी. अंतराचा उड्डाणपूल (Flyover) बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 65 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बुधवार पेठ, पन्हाळा नगरपरिषद, टोल प्लाझा या ठिकाणी एक किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे.
या एक किलोमीटरपैकी तब्बल 500 मीटर अंतर वन विभाग व पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येते. या विभागांकडून जमीन मिळविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असून, पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र, अद्याप या विभागांनीही प्रतिसाद दिलेला नाही. उड्डाणपुलाच्या प्रस्तावाची फाईल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिझाईन सर्कलकडे पेंडिंग आहे.