काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा शिरकाव

(political news) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कसबा बावडा परिसराने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्या उमेदवाराच्या बाजूने बावडा उभा राहतो, त्याला किमान 16 ते 17 हजारांचे मताधिक्य मिळत असल्याचे यापूर्वीच्या निवडणूक निकालावरून दिसून आले आहे. पालकमंत्र्यांच्या या बालेकिल्ल्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपने चांगल्या पद्धतीने शिरकाव करत हे मताधिक्य निम्म्यावर आणत धक्‍का दिला आहे. त्यामुळे पालकमंत्री जिंकले असले तरी त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने घेतलेली मते बावडेकरांना विचार करायला भाग पाडणारी आहेत.

भाजपच्या उमेदवारास देखील आपल्या भागात अपेक्षित मते मिळविण्यास अपयश आले आहे. कदमवाडी, भोसलेवाडी, सदर बाजार, विचारे माळ परिसरात महापालिकेच्या 2015 च्या निवडणुकीत भाजपला मानणार्‍या नगरसेवकांची संख्या अधिक होती. तरीदेखील या परिसरातून भाजप उमेदवारास फारसे मताधिक्य मिळविता आलेले नाही. उलट सदर बाजार, विचारे माळसारख्या भागांत त्यांना खूप मागे राहावे लागले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शहरातील सर्व पेठा, ताराराणी चौकापासून बापट कँपपर्यंतचा भाग आणि कसबा बावडा येथील मतदान निर्णायक मानले जाते. यामध्ये कसबा बावड्याकडे सर्वांचे अधिक लक्ष असते. रमण मळ्यापासून ते राजाराम साखर कारखान्यापर्यंतचे मतदार कसबा बावडा परिसरात येतात. पालकमंत्री सतेज पाटील यांचे कसबा बावडा येथे निवासस्थान आहे. त्यामुळे राजकारणात प्रवेश करताना आपल्या गावात दुसरा पक्ष फारसा रुजणार नाही, याची काळजी त्यांनी सुरुवातीपासूनच घेतली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत या परिसरात येणार्‍या सात प्रभागांमध्ये वाट्टेल ती किंमत मोजून ते आपल्याच गटाचा नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करत असतात. महापालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभेची निवडणूक असो, ते प्रचार सांगतेच्या पूर्वसंध्येला कसबा बावडा येथे प्रचंड मोठी सभा घेतात आणि आपली भूमिका सांगतात. त्यामुळे कसबा बावडा परिसरातून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भरभरून मते मिळत असतात. (political news)

या पोटनिवडणुकीत मताधिक्य वाढेल असे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात मताधिक्य घटून ते निम्म्यावर आल्याने भाजपने कसबा बावड्यामध्ये चांगल्या प्रकारे शिरकाव केल्याचे दिसून येते. परिसरात भाजपचा एकही नगरसेवक नाही की, भाजपचा एखादा प्रमुख कार्यकर्ताही नाही; तरीही भाजपने या भागावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी स्वतंत्र टीम या परिसरासाठी तयार केली होती. ती छुप्या पद्धतीने दिवसरात्र काम करत राहिल्यामुळे भाजपने कसबा बावड्यात चांगलीच मते मिळविली आहेत.

फॅक्ट चेक

कसबा बावडा परिसरातील 38 केंद्रांवर भाजपला 8439, तर काँग्रेसला 16,307 मते मिळाली आहेत. एक नंबरच्या मतदान केंद्रावर तर भाजपच्या उमेदवाराला जवळपास 100 जादा मते मिळाली आहेत. अन्य मतदान केंद्रांपैकी सहा मतदान केंद्रांचा अपवाद वगळता भाजपला चांगली मते मिळाली आहेत. मंगळवार पेठेत काँग्रेसला चांगली मते मिळाली असली तरी साठमारी परिसरासह नऊ मतदान केंद्रांवर भाजपला जादा मते मिळाली आहेत.
उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या नागाळा पार्क व ताराबाई पार्क परिसरात मात्र कदम यांना मातधिक्य मिळाले. या परिसरातून कदम यांना 6431, तर जाधव यांना 5694 मते मिळाली. या परिसरातील बहुतांशी माजी नगरसेवक काँग्रेसचे आहेत. तरी देखील येथून भाजपला जादा मते मिळाली.

बुधवार पेठ, सिद्धार्थनगर परिसराकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कारण या परिसरात शिवसेनेचे प्राबल्य होते. त्यामुळे त्यांचा कल मतदानातून दिसणार होता. मताच्या आकडेवारीवरून शिवसेनेने मदत केल्यामुळे या परिसरातून काँग्रेसच्या जाधव यांना मताधिक्य मिळाले. त्यांना 4358, तर कदम यांना 2376 मते मिळाली.

जाधववाडी, कदमवाडी, सदर बाजार, विचारे माळ भागावर सत्यजित कदम यांची भिस्त होती. स्थानिक उमेदवार म्हणून येथूनच मताधिक्याची शक्यता होती; परंतु त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात कंबर कसल्यामुळे महाविकास आघाडीच्या जाधव यांना 13 हजार 146 मते, तर भाजपच्या कदम यांना 11 हजार 300 मते मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *