अॅड. गुणरत्न सदावर्ते कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी (police) त्यांचा ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. तो मंजूर होताच कोल्हापूर पोलिसांचे पथक ऑर्थर रोड कारागृहात गेले. तेथून अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेऊन हे पथक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूरकडे रवाना झाले.
मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अॅड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले होते. मंगळवारी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
बुधवारी दुपारी गिरगाव न्यायालयात कोल्हापूर पोलिसांचा (police) अर्ज मंजूर झाला. यानंतर पोलिसांचे पथक अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेऊन कोल्हापूरकडे निघाले. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या नेतृत्वाखालील हे पथक सदावर्ते यांना आणल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात अटकेची कारवाई केली जाईल.
आज न्यायालयात हजर करणार
अॅड. सदावर्ते यांना आज (दि. 21) येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शाहूपुरी पोलिस चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी करतील. दरम्यान, अॅड. सदावर्ते यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. सुनावणीनंतर हा अर्ज गुरुवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे.