कोल्हापूर :कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना मिळणार अनुदान!
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान (grants) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील ८५०० रुग्णांच्या नातेवाइकांना अनुदान मंजूर झाले आहे. तर, मयताचे योग्य कारण किंवा कोरोना झालेले प्रमाणपत्र नसल्याने १३०० रुग्णांचे अनुदान नाकारले आहे. कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांचे नातेवाईक अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून वेळोवेळी सुनावणी घेऊन आवश्यक कागदपत्रे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १० कोटी रुपये वाटप झाले आहे. तर, ३२ कोटी अनुदान वाटप करणे बाकी आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या खर्चासह हातभार म्हणून राज्य शासनाने मयतांच्या कुटुंबीयांना आर्थिक (grants) मदत देण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. आजपर्यंत २ लाख २० हजार ३४६ लोकांना कोरोनाची लागण झाली. यापैकी शासकीय पोर्टल कोरोनाने मृत झालेल्या ५०११ रुग्णांची नोंद आहे. तर, खासगी रुग्णालयात किंवा घरीच मयत झालेल्या रुग्णांची नोंद शासकीय पोर्टलला (आयसीएमआर) नोंद नाही; पण त्यांच्याकडे कोरोनामुळे मृत्यू झाला, असे प्रमाणपत्र असणाऱ्यांनाही लाभ दिला जात आहे. आतापर्यंत २००० रुग्णांच्या नातेवाइकांच्या बॅंक खात्यावर प्रत्येकी ५० हजारांचा निधी जमा झाला आहे.
काहींना लाभ मिळत नसल्याने तक्रार होत्या. सुनावणीत ज्यांना लाभ मिळत नाही किंवा ज्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. अशांना त्यांचे अर्ज नामंजूर होण्याची कारणे सांगितली जातात. ज्यांना आवश्यक कागदपत्रे जोडणे शक्य आहे. अशांकडून नव्याने कागदपत्रे घेऊन त्यांना लाभ दिला जातो.
कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी काही नातेवाइकांनी कोरोनामुळे मयत झालेले प्रमाणपत्र आणलेले नाही. दवाखान्यात उपचार घेत असल्याचे प्रमाणपत्र जोडलेले नाही. अशांना मदत निधी डावलला जातो. योग्य प्रमाणपत्र दिल्यास निश्चितपणे त्यांना लाभ दिले जातात.
– प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी