शंभर सेकंद संपूर्ण जिल्हा होणार स्तब्ध
लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त दि. 15 मे रोजी ‘कोल्हापुरी चप्पल’ दिवस आयोजित केला आहे. या दिवशी सर्व नागरिकांनी दिवसभर पारंपरिक वेशभूषेसह (costumes) कोल्हापूर चप्पल परिधान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत केले.
‘कोल्हापुरी चप्पल’ उपक्रमात सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. या दिवशी कोल्हापुरी चप्पलसह कोल्हापुरी वैशिष्ट्ये सांगणारी वेशभूषा (costumes) करा. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मित्र, नातेवाईक, सहकारी आदीं एकमेकांना आवाहन करा, त्याकरिता विविध माध्यमांचा वापर करा. विविध तालीम मंडळे, संस्था, संघटना आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. दुर्मीळ छायाचित्रे, आदेश, पत्रांचे शनिवारपासून प्रदर्शन राजर्षी शाहूंच्या दुर्मीळ छायाचित्रे, वआदेश, पत्रव्यवहार आदींचे शनिवार दि.23 पासून शाहू मिल येथे प्रदर्शन सुरू होईल. हे प्रदर्शन दि. 22 मे पर्यंत दररोज सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
एकाच दिवशी 100 वक्त्यांची 100 ठिकाणी व्याख्याने
राजर्षी शाहूंच्या कार्याची महती सांगणार्या 100 वक्त्यांची कोल्हापूर जिल्ह्यांसह जिल्ह्याबाहेरहील एकूण 100 ठिकाणी व्याख्याने होणार आहेत. दि. 5 मे रोजी एकाच दिवशी हा उपक्रम होणार आहे.
शंभर सेकंद जिल्हा होणार स्तब्ध
दि. 6 मे रोजी राजर्षी शाहूंची स्मृती शताब्दी आहे. या दिवशी शाहूकालीन विविध वास्तू आणि स्थळांपासून कृतज्ञता फेर्या काढल्या जाणार आहेत. या फेर्या शाहू समाधी स्थळ येथे येऊन समाधीस्थळावर फुले अर्पण करतील. यानंतर पोलिस बिगुल वाजवला जाईल. त्यानंतर संपूर्ण जिल्हा आहे त्या जागेवर 100 सेंकंद स्तब्ध राहून राजर्षी शाहूंना आदरांजली वाहणार आहे. याची आवश्यक ती सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. याकरिता गाव पातळीवरील सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे रेखावार यांनी सांगितले.