“चंद्रकांत पाटलांना थोडे दिवस विश्रांती देऊ”
भाजपचे (political party) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टुकडे टुकडे गँग वेळीच आवरावी, असे आवाहन केले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जशास तसे उत्तर दिले. ते म्हणाले, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर आता बोलणे आवश्यक आहे, असे वाटत नाही. त्यांचा मोठा पराभव झालेला आहे. कोल्हापूरने त्यांना कौल दिला आहे. त्यामुळे त्यांना थोडे दिवस विश्रांती देऊ.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनंतर ना. जयंत पाटील येथे पत्रकारांशी बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, भाजप फार जुना पक्ष आहे. जेव्हापासून मानवजात पृथ्वीवर जन्माला आली तेव्हापासून जरी म्हटले तरी चंद्रकांत पाटलांच्या कोणत्याही विधानावर आम्ही शंका घेणार नाही. जुने प्रवाह आणि संस्कृती भाजपमध्ये असल्यासारखे त्यांना वाटते. भारतातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेसच्या अगोदर कोणताही पक्ष नव्हता. त्यानंतर जनसंघ तयार झाला. पण काँग्रेसने आपले नाव बदलले नाही. जनसंघाने कात टाकून जनता पक्ष केला. जनता पक्षानंतर भारतीय जनता पक्ष आला.
त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा जो दावा आहे, तो पाच हजार नव्हे तर 50 वर्षेदेखील मागे जाऊ शकत नाही. काँग्रेसने नाव बदललेले नाही. उलट भारतीय जनता पक्ष, जनसंघ त्यांच्यामध्ये जनता पार्टी (political party) अशी तीनवेळा भाजपने पक्षाची नावे बदलली आहेत. अनेक स्थित्यंतरे त्यांनी पाहिली आहेत. तरीदेखील चंद्रकांत पाटील भाजप पाच हजार वर्षांचा आहे, असे म्हणत असतील तर त्यांना आपला पाठिंबा असल्याचेही मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.