इचलकरंजीत घडली मन हेलावून टाकणारी घटना
(crime news) भरधाव स्पोर्टस् बाईकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या आदित्य आदिनाथ जाधव (वय 6, रा. जवाहरनगर परिसर) या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी जवाहरनगर येथील जोतिबा मंदिर परिसरात ही घटना घडली. मोटारसायकलस्वार अल्पवयीन मुलगाही जखमी झाला आहे.
मूळचे सातारा जिल्ह्यातील खिवशी गावातील आदिनाथ जाधव कुटुंबीयांसमवेत गेल्या काही वर्षांपासून जवाहरनगर परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा आदित्य गुरुवारी सायंकाळी घरासमोर खेळत होता. यावेळी भरधावपणे दुचाकी चालवणार्या अल्पवयीन मोटारसायकलस्वाराने त्याला जोरदार धडक दिली.
या अपघातात सुमारे 100 ते 150 फूट आदित्य फरफटत गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी इंदिरा गांधी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर बनल्याने त्याच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. आदित्य याच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातातील मोटारसायकल शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अल्पवयीन मोटारसायकलस्वार मूळचा वडगाव येथील असून, शिक्षणासाठी नातेवाईकांकडे तो राहत आहे. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (crime news)