कुत्रा घरात घुसल्याच्या कारणावरून फावडं डोक्यात घालून खून
कुत्रा घरी आल्याच्या क्षुल्लक कारणावरून वडिलांशी झालेल्या भांडणात 21 वर्षीय तरूण मुलाने 35 वर्षीय युवकाच्या डोक्यात फावडं घालून त्याचा खून केला. ही घटना गुरूवारी (दि.21) सायंकाळच्या सुमारास घडली. गणेश मडावी (वय 35) असे मृताचे नाव आहे. तर आरोपी वडील प्रभाकर भोंगळे (वय 50), मुलगा रोहित भोंगळे (वय 21), आई ताराबाई भोंगळे यांना विरूर पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांसह बोकड ठार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूरा तालुक्यातील विरूर पोलिस स्टेशन हद्दीतील पंचाळा या खेडेगावात गणेश मडावी आणि प्रभाकर भोंगळे हे शेजारी राहतात. गणेश मडावी हा दारू पिऊन आल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून दोन्ही कुटूंबात कोणत्या ना कोणत्या कारणांवरून भांडण व्हायचे. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत असलेला मृतक गणेश मडावी हा गुरूवारी (21 एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास घरी आला. त्याने घरी बांधून असलेला कुत्रा मोकळा सोडून दिला. तो कुत्रा शेजारील प्रभाकर भोंगळे यांच्या घरात शिरला. घरी कुत्रा आल्याने त्याला हाकलून लावण्यात आले.
कुत्र्याला हाकलून लावल्याचा प्रकार गणेश मडावी ह्याच्या निदर्शनास आला. त्यामुळे अगोदरच त्या कुटुंबासोबत त्यांचे पटत नसल्याने मडावी याने भोंगळे यांचे घरी जावून कुत्र्याला हाकलून लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडायला सुरूवात केली. यावेळी गणेश मडावीने प्रभाकर भोंगळेचे कॉलर पकडुन त्यांना मारहाण करायला सुरूवात केली. वडिलांना मारहाण होवू लागल्याने मुलगा रोहित संतापला. संतापलेल्या मुलाने धावत येत, घरी बांधकाम साहित्याजवळ पडून असलेले फावडे उचलले आणि मडावी याच्या डोक्यात घातले. एकाच वारातच तो खाली पडला. त्याला लगेच राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर जखम झाल्याने रूग्णालयात नेत असताना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रूग्णालयात गंभीर जखमी मडावी ह्याला भरती केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. कुत्रा घरी येण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकाला जिवाला मुकावे लागले तर एका कुटूंबाला कारागृहात जावे लागले आहे.
मृतक गणेश मडावी ह्याची पत्नी सुनीता हिच्या तक्रारीवरून विरूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम 302, 504, 505, 506 व 34 आणि अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी प्रभाकर भोंगळे, मुलगा रोहित भोंगळे, पत्नी बयाबाई ऊर्फ ताराबाई भोंगळे ह्या एकाच कुटूंबातील तिघांना अटक केली आहे. पुढील तपास राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विरूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण करीत आहेत.