शिवसेनेला धमक्या देऊ नका; अन्यथा गाडले जाल : संजय राऊत
अमरावतीचे बंटी-बबली मुंबईत आले होते. त्यांना शिवसेनेने पळवून लावले. आम्हाला धमक्या देऊ नका. अन्यथा २० फूट खाली गाडले जाल, असा इशारा शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिला.
आज दुपारी आमदार रवी राणा यांनी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यात विघ्न नको म्हणून ‘मातोश्री’ समोरील हनुमान चालिसा पठण आंदोलन मागे घेत आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला. तसेच पेढे आणि साखर वाटण्यात आली.
राणा दांपत्याने मुंबईतील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, अमरावतीचे बंटी-बबली मुंबईत आले होते. त्यांना शिवसेनेने पळवून लावले. आम्हा धमक्या देऊ नका. अन्यथा २० फूट खाली गाडले जाल. आम्हाला हिंदुत्व काेणीही शिकवू नये. भाजपकडून अत्यंत हिन पातळीचे राजकारण सुरु आहे, असा आराेपही त्यांनी केला.
काही बोगस घंटाधारी हिदूत्वावादी वातावरण गढूळ करत आहेत. अमरावतीचे बंटी आणि बबली सत्यवादी असल्याचा आव आणतंय. त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानाच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, म्हणून राणा दाम्पत्याने पळ काढला. पंतप्रधानांच्या दौऱ्याची जबाबदारी सर्वांची आहे. पंतप्रधानांच्या रक्षणासाठी सेना उभी राहील. खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ला करत आहेत. शिवसेनेचे हिंदूत्व गदाधारी आहे. घंटाधारी नाही. आम्हाला हिंदूत्व शिकविण्याचे अतिशहाणपणा करू नका. शिवसैनिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राऊत पुढे म्हणाले की, प्रभू श्रीरामाचे नाव घेण्यास राणा यांचा विरोध होता. असे असतना त्यांनी शिवसेनेला आणि आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना धमकी देऊ नका. शिवसेनेच्या वाट्याला जाल तर सळो की पळू करून सोडीन. राणा दांपत्याच्या या गोंधळा मागे भाजप आहे. काही व्यक्तींना हाताशी धरून शिवसेनेला आव्हान देण्याचा भाजपचा प्रयत्न अशी अनेक आव्हाने शिवसेनेने परतावून लावली आहेत. कायदा आणि घटना आधी राज्यपालांना शिकवा. जातीचे बोगस सर्टीफेकिट घेऊन निवडून आलेल्या खासदारांनी आम्हाला नितिमत्तेच्या गोष्टी शिकवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.