शरद पवारांबरोबर मतभेद, मात्र ते जातीयवादी नाहीत : राजू शेट्टी
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो. आमचे-त्यांचे वैचारिक मतभेत आहेत. मात्र, ते जातीवादी नाहीत, असं स्पष्ट मत खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज कऱ्हाड (जि. सातारा) इथं व्यक्त केलं बळीराजा उध्दार यात्रेनिमित्त राजू शेट्टी शनिवारी कऱ्हाडला (जि. सातारा) आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानीचे सचिव राजेंद्र गड्डेनवार, जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, रामचंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. शेट्टी पुढे म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगाव देवराष्ट्रे पासून बळीराजा उध्दार यात्रा सुरु झाली आहे. एक मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत शेतीला दिवसा १० तास वीज मिळावी, शेतकऱ्यांना हमीभावाचा गॅरंटी कायदा केंद्र सरकारनं (Central Government) मंजूर करावा हे दोन ठराव करण्यात येणार आहेत. ते ठराव घेवून उच्च न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत. राजकाणापलीकडं जावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचा हा प्रयत्न आहे.’
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो. त्यांचं राजकारणही बघतो. भले त्यांचे-आमचे वैचारिक मतभेत आहेत. मात्र, एवढ्या दिर्घ काळात त्यांनी कधीही जातीयवादी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळं मी स्पष्टपणे सांगतो की, ते जातीवादी नाहीत. मात्र, शेतकऱ्यांऐवजी ते शेती मालावर प्रक्रिया करणारी जी लॉबी आहे, त्यांना डोळ्यासमोर ठेवून धोरण घेतात. त्यामुळं त्यांचे आणि आमचे वैचारिक मतभेद आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.