भोंग्याबाबत केंद्रानं निर्णय घेतल्यास राज्यातही लागू करु – गृहमंत्री
राज्य सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे आज सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. यादरम्यान या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. सकाळी ६ ते रात्री १० भोंगे बंद करता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकासाठी कायदा समान असून सर्वांना एकच भूमिका घ्यावी लागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. कायदा भंग झाला तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, भोंग्यांसंदर्भातली विषयावर आम्ही केंद्राशी बोलू. इतर राज्यात काय परिस्थिती आहे ते ही तपासून घेऊ. आज बैठकीत आतापर्यंत जे जीआर निघाले त्याआधारे निर्णय घेत आहोत. पोलिस विभगाशी बोलून नव्याने गाईड लाइन्स काढणार आहेत का यावरही चर्चा केली जाईल. आम्ही सर्व एकत्र काम करत असतो. आरोप सगळे करतात आता त्या आरोपांचा कंटाळा येतो, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले आहे.दरम्यान, मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झालो. मात्र आम्ही अमच्या मतावर ठाम आहे. याप्रकरणी मार्गदर्शक सूचना काय असाव्या हे सरकारनं ठरवलं पाहिजे. मनसेचा 3 मेचा अल्टिमेटम कायम आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही.