लग्नानंतरही प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला

नात्यातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मुरूम (ता. बारामती) येथे घडली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैभव दीपक खरात, हर्षद थोरात व सनी खुडे (रा. तळवणीनगर, मुरूम, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

रविवारी (दि. २४) रात्री सव्वा बारा वाजता सोमेश्वर कारखाना ते मुरूम रस्त्यावरील विकासनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी मुरूम येथील युवराज नारायण सोनवणे यांनी फिर्याद दिली. या घटनेत त्यांचा आदित्य हा २२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य याचे एका मुलीशी गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. या कारणावरून फिर्यादीचा मुलगा व आरोपींमध्ये या पूर्वीही वाद झाला होता. परंतु ते एकमेकांचे नातेवाईक असल्याने तो चर्चेने मिटविण्यात आला होता. दरम्यानच्या काळात संबंधित मुलीचा विवाह झाला. परंतु, आदित्य व ती फोनवरून एकमेकांच्या संपर्कात असल्याचा संशयितांना संशय होता. याच कारणावरून रविवारी रात्री आदित्य याला दुचाकीवरून गाठून संशयितांनी त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने डोक्यात, चेहऱ्यावर, हातावर, पोटावर वार करून गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *