सांगली जिल्ह्यात वादळी वार्यासह पाऊस, गारपीट
सांगली, मिरजेसह वाळवा, शिराळा, मिरज, तासगाव, पलूस तालुक्यांत तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी मध्यरात्री जोरदार वार्यासह वादळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट झाली. शहरात आणि ग्रामीण भागात अनेक भागात विद्युत तारा तुटल्या. वादळी वार्याने झाडे उन्मळून पडली. तसेच पावसाच्या तडाख्याने उसासह भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सांगलीत रविवारी पहाटेपासून मेघगर्जना आणि जोरदार वार्यासह वादळी पाऊस कोसळला. शहरातील मैदानात, स्टेशन चौक, झुलेलाल चौक, मारूती रोड, छत्रपती शिवाजी मंडई, राममंदिर चौक, बसस्थानक परिसर, राजवाडा चौक आदी सखल भागात पाणीच पाणी झाले होते. ठिकठिकाणी पावसाने दलदल निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या. सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. सांगली – माधवनगर मार्ग, वसंतदादा साखर कारखाना परिसर, जलशुद्धीकरण केंद्र परिसर, जुन्या फायर स्टेशन परिसरासह अनेक भागात झाडे उन्मळून पडली होती. विद्युत तारा तुटल्या होत्या. अनेक ठिकाणी यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.
इस्लामपूर ः वाळवा तालुक्यात रविवारी पहाटेपासून वादळी वार्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने अनेक भागात ऊस भुईसपाट झाला आहे. विद्युत तारा तुटल्या. अनेक गावांतील विद्युतपुरवठा खंडित झाला होता.
शिराळा ः तालुक्यात पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. सागाव, बिळाशी, कोकरुड, शेडगेवाडी, चरण, आरळा, वारणावती, येळापूर, वाकुर्डे शिरशीसह परिसरात जोरदार पाऊस झाला. आंबा, मका, ऊस यांचे मोठे नुकसान झाले.
कवठेपिरान ः मिरज पश्चिम भागातील कवठेपिरान, दुधगाव, समडोळीसह परिसरात रविवारी पहाटे जोरदार पाऊस कोसळला. पावसाने अनेक ठिकाणी ऊस भुईसपाट झाला. भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले.
सोनी ः सोनीसह भोसे, करोली, पाटगाव, धुळगाव भागाला शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपले. पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. द्राक्षाला हा पाऊस उपयुक्त असल्याने उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला.
आष्टा : आष्टा व परिसराला वादळी वार्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाने भाजीपाला व फळबागासह अन्य पिकांचे मोठेच नुकसान झाले. कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, फाळकेवाडी, बागणी, नागाव, पोखर्णी, बावची, गोटखिंडी या भागातही जोरदार पाऊस झाला.
मिरज : शहराला रविवारी मध्यरात्री जवळपास तास – दीड तास पावसाने झोडपून काढले. पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गाराही पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. मार्केट परिसरात तर पाण्याचा लोंढा वाहत होता.
बुधगाव ः बुधगावसह परिसरातही रविवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वादळी वार्याने अनेक झाडे उन्मळली होती. फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. काहीकाळ वाहतूक ठप्प झाली.