विद्यार्थ्यांचा पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव

श्रीलंकेची (Sri Lanka) अर्थव्यवस्था ढासळल्यामुळं विरोधक आणि विद्यार्थ्यांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांच्या विरोधात ९ एप्रिलपासून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. राजपक्षे यांच्या विरोधातील आंदोलनाला १६ दिवस पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान निवासाला रविवारी विद्यार्थ्यांनी घेराव घातला. आंतरविद्यापीठ विद्यार्थी फेडरशेनच्या हजारो विद्यार्थ्यांनी वेजेरमा मवाता येथील पंतप्रधान निवासाबाहेर घोषणाबाजी केली. आंदोलक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान निवासाच्या भिंतीवर राजपक्षे घरी जा, असं लिहिलं आहे.
आंदोलाकंकडून राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. काही विद्यार्थी आंदोलकांनी पंतप्रधान निवासाच्या भींतीवर राजपक्षे घरी जा, असं लिहिलं आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानं मोठं संकट निर्माण झालं आहे. राजपक्षे सरकारकडे महत्त्वाच्या वस्तूंची आयात करण्यासाठी देखील पैसे शिल्लक नसल्याचं समोर आलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.

पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी विरोधकांची अंतरिम सरकारची मागणी फेटाळून लावली आहे. दुसरीकडे आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोलंबोतील रस्त्यांवर आंदोलन करण्यास न्यायालयाची मनाई असल्याचं पोलिसांनी आंदोलकांना सांगितलं होतं,

कर्जात बुडालेल्या श्रीलंकेत महागाईचा दर मार्च २०२२ मध्ये २१.५ टक्केंवर पोहोचला होता. जणगणना आणि सांख्यिकी विभागानं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार मार्चमध्ये महागाईचा दर वाढला आहे. फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर १७.५ टक्के होता. श्रीलंकेत तांदूळ, साखर, दूध आणि ब्रेड यासारख्या वस्तूंचे दर वाढले आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून श्रीलंकेला आर्थिक संकटातून वाचण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. अर्थमंत्री अलसी साबरी यांच्या शिष्ठमंडळानं आयएमएफची भेट घेत होती. श्रीलंकेला करोना विषाणू संसर्गाचा मोठा फटका बसला होता. कोरोना विषाणू संसर्गामुळं श्रीलंकेतील पर्यटन व्यवसाय ठप्प राहिल्यानं अर्थव्यवस्था कर्जात बुडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *