मला व्यवहार कळत नाही हे माझ्या बहिणीला माहितीये’; मुंडे
मला व्यवहारातलं काहीच कळत नाही, ही गोष्टी दुसऱ्या कोणालाही माहिती नसेल. पण ही गोष्ट माझ्या बहिणीला ठाऊक आहे, असे वक्तव्य राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले. बीडच्या राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे अनेक दिवसांनंतर मुंबईतील एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी मुंडे भावाबहिणीत शाब्दिक जुगलबंदी रंगताना दिसली. नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या नेत्रालयाचा उद्घाटन समारंभ मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी शाब्दिक फटकेबाजी केली.
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात बीडच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी मुंडे आणि लहाने यांच्या परिवारामधील जवळचा संबंध अधोरेखित केला. बीड जिल्ह्याला डॉक्टर तात्याराव लहाने यांचा सार्थ अभिमान आहे. पुढच्या १० पिढीला तो तसाच अभिमान राहील. परंतु या नेत्र चिकित्सालयात सगळेच उपचार मोफत करू नका. कारण तुमचेही कुटुंब आहे. थोडीशी व्यावहारिकता असली पाहिजे. मी लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतोय, पण मला व्यवहारिकता जमत नाही. हे आमच्या ताईला चांगलं माहिती आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
यानंतर पंकजा मुंडे यांनीही आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांचा उल्लेख आल्यावर शाब्दिक कोटी केली. आजचा कार्यक्रम डोळ्यांशी संबंधित असल्यामुळे दृष्टीला अर्थात लेन्सेसला महत्व आहे. सद्यस्थितीत शरद पवार यांच्यासारख्या अनुभवाच्या राजकीय लेन्सेस दुसऱ्या कोणाकडेही नसल्याचे पंकजा यांनी म्हटले. यानंतर धनंजय मुंडे यांचा उल्लेख करताना पंकजा यांनी म्हटले की, मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत:ला मोठं करत आज पवार साहेबांच्या लेन्सेसमधून पाहण्याचही भाग्य फार कमी लोकांना लाभले आहे. त्यापैकीच एक धनजंय मुंडे आहेत, असे पंकजा यांनी म्हटले. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अमित देशमुख यांच्यासह लहाने कुटुंबीय उपस्थित होते.