“….त्याला भाजप घाबरणार नाही, जशास तसे उत्तर देऊ”

(political news) हात तोडण्याची भाषा करणार्‍या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली. पोलिसांच्या आडून सरकार दंडेलशाही करत आहे; पण त्याला भाजप घाबरणार नाही, जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी संभाजीराजे यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, मध्य प्रदेशप्रमाणे राज्य सरकारने कायदेशीर प्रक्रिया गतीने पूर्ण केली असती, तर महाराष्ट्रातही ओबीसींना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळाला असता. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली, असाही आरोप त्यांनी केला.

दरेकर म्हणाले, खा. सुळे हात तोडण्याची भाषा करत आहेत. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे वक्तव्य कसे केले जाऊ शकते? या वक्तव्याची पोलिस चौकशी करून कारवाई करणार का, असा सवाल केला. संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना पाठिंबा देणार नसल्याने, शिवसेनेचे संभाजीराजे यांच्याबद्दलचे प्रेम दिसून आले आहे. महाविकास आघाडी संभाजीराजे यांची फसवणूक करत आहे, असेच दिसत असल्याचा आरोप केला.

जर मध्य प्रदेश सरकार गतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात पावले उचलून त्यांना राजकीय आरक्षण मिळवून देऊ शकते; मग महाराष्ट्र सरकारचे हात कोणी बांधलेत, असा सवालही दरेकर यांनी केला. महाराष्ट्र सरकारमधील काही प्रस्थापित, धनदांडग्या नेत्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे आहे की नाही, असा संशय जनतेच्या मनात आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ‘एव्हरेस्टवीर’ कस्तुरी सावेकरचे त्यांनी अभिनंदन केले. (political news)

महागाईवाढीला राज्य सरकारच जबाबदार आहे. राज्य सरकार विनाकारण केंद्राकडे बोट दाखवत आहे; पण वस्तुस्थिती वेगळी असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने व्हॅट कमी केला, तरी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होतील. केंद्राने जीएसटीचे सर्व पैसे दिले आहेत. सरकारला कोणताही लोकोपयोगी निर्णय घ्यायचा नाही, त्यांना केवळ वसुली करायची आहे, असाही आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *