श्रीकृष्ण जन्मभूमी-ईदगाह वादावर होणार सुनावणी
ज्ञानवापी मशिदमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीची चर्चा सुरू झाली आहे. लोकांनी आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा सर्व्हे करण्याची मागणी केली आहे. मथुरा येथील एका न्यायालयात जन्मभूमीच्या १३.३७ एकर परिसर जागेची मालकी मिळवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. १ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. याचिकेत २.३७ एकर इतकी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या भाग असलेल्या १३.३७ एकर जमीनीपैकी ११ एकर परिसरात सध्या जन्मस्थान आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधण्यात आलेली शाही ईदगाह मशिद हटवण्याची मागणी फार जुनी आहे. २०२० मध्ये कोर्टाने मशिद हटवण्याची याचिका फेटाळून लावली होती. कटरा केशव देव मंदिराच्या १३.३७ एकर परिसराच्या आत असलेली मशिद हटवण्यासाठी अनेक हिंदू संघटनांनी याआधीच मथुरेतील न्यायालयात १० वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. याचिकेत असा दावा केला आहे की, कृष्ण जन्मस्थानावर मशिद बांधण्यात आली आहे. मथुरा कोर्टात दाखल याचिकेत असे म्हटले आहे की हिंदूंचा असा विश्वास आहे की, श्रीकृष्णाचा जन्म त्याच ठिकाणी झाला होता जेथे मशिद आहे.
याचिकेत असे म्हटले आहे की, जन्मभूमी परिसराचा सर्व्हे करून त्याचा रिपोर्ट सादर केला जावा. ज्या ठिकाणी मशिद आहे तेथे कृष्णाचा जन्म झाला होता. मशिद असलेल्या ठिकाणी तुरुंग होते आणि तेथेच कृष्णाचा जन्म झाला होता. याचिकेत २.३७ एकर जमीनीचा मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या एकूण १३.३७ एकर जागेपैकी ११ एकर जागेवर सध्या श्रीकृष्ण जन्मभूमी आहे. जर शाही ईदगाह मशिद २.३७ एकर परिसरात आहे.