जिल्ह्यात जुगार अड्ड्यांचे फुटले पेव!
(crime news) सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये जुगार अड्ड्यांचे पेवच फुटले आहे. या अड्ड्यांमुळे फाळकूट आणि सराईत गुन्हेगारांना एकप्रकारे आश्रयच मिळत आहे. पोलिस मात्र वरिष्ठांची शाब्बासकी मिळविण्यासाठी कागदोपत्री कारवाई करीत आहेत. ‘चक्री’ जुगारही नव्याने सुरू झाला आहे. कुपवाड येथे व्हिडीओ गेम चालकाचा खून झाल्याने जुगार अड्ड्यांचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. मटका, कॅसिनो, क्रिकेटवरील सट्टा, तीन पानी जुगार, चक्री जुगार अड्ड्यांचे सांगली, मिरज आणि आष्टा ही शहरे मुख्य केंद्रे बनली आहेत.
चिठ्ठीवरील जुगाराची गावोगावी खोकी थाटली गेली आहेत. आष्टा (ता. वाळवा), तासगाव व जत येथे ‘चक्री’ जुगार जोरात आणि खुलेआम सुरू आहे. पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. ऑनलाईन गेम नावाच्या जुगारात तरुण पिढी गुरफटली गेली आहे. प्रत्येक पंधरा मिनिटाला निकाल लागणार्या जुगाराचे अड्डे खूप वाढले आहे. खेळलं की पंधरा मिनिटात निकाल लागतो. त्यामुळे अनेकजण या अड्ड्यावर दिवसभर खेळण्यासाठी गर्दी करतात. मोबाईलवरील जुगार नव्याने सुरू झाला आहे.
यामध्ये सोशल मीडियावर ग्रुपच काढण्यात आला आहे. गेम बसला तर पेमेंटही ऑनलाईनच दिले जात आहे. पोलिस कारवाईचे कोणतीही भीती नसल्याने हा जुगार चांगलाच वाढला आहे. प्रत्येक प्रकारच्या जुगारातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. वरिष्ठ अधिकार्यांची शाब्बासकी मिळविण्यासाठी पोलिस ठाण्याकडून जुजबी कारवाई केली जाते. सातशे किंवा आठशे रुपयांचा माल जप्त केला जातो. (crime news)
अदखलपात्र गुन्हा दाखल करून जुगार घेणार्या संशयितांना सोडून दिले जाते. त्यानंतर ते पुन्हा त्याच जागेत जुगार घेण्यास सुरुवात करतात. पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने जिल्हाभर विविध प्रकारच्या जुगारांचे पेव फुटले आहे. जुगारावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक होते. पण हे पथक काही महिन्यापूर्वी बरखास्त करण्यात आले आहे. पथकाच्या भीतीने स्थानिक पोलिस कारवाई करीत होते. मात्र आता पथक नसल्याने कोण कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या जुगारा अड्ड्यांमुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे.
‘एजंट’ नवे…‘मालक’ जुनेच!
जुगार अड्ड्यांचे मालक जुनेच आहेत. पोलिसांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अनेकदा छापा पडण्यापूर्वी त्यांना खबर मिळते. एजंट मात्र नवीन आहेत. 25 ते 30 वयोगटात तरुणही हाताला कामधंदा नसल्याने एजंट म्हणून काम करीत आहेत. दिवसकाठी पाचशे रुपये पगार आणि घसघसशीत कमीशनही त्यांना दिले जात आहे.