भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी!
भारतात करोना (corona) संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात करोना विषाणू संसर्गाचा एक नवीन व्हेरियंट सापडला आहे. हा व्हेरियंट ओमिक्रॉनचा उपप्रकार बीए.४ असून हैदराबादमध्ये पहिला रुग्ण सापडला आहे.
अफ्रिकेहून आलेल्या एका प्रवाशाला ओमिक्रॉनच्या बीए.४ व्हेरियंट सापडला आहे. हैदराबाद विमानतळावर आल्यानंतर त्याची चाचणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९ मे रोजी या रुग्णांची चाचणी करण्यात आली होती. मात्र, रुग्णामध्ये कोणतेही लक्षण दिसून आले नव्हते. दरम्यान, हा प्रवासी १६ मेला पुन्हा अफ्रिकेला गेला. मात्र, या कालावधीत तो शहरात फिरत असल्याचं समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
साऊथ अफ्रिकेत सापडला होता पहिला रुग्ण
जानेवारीमध्ये पहिल्यांदा दक्षिण अफ्रिकेत व्हेरियंट बीए.४चा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर वेगाने इतर देशातही त्याचा फैलाव झाला. एक डझनपेक्षा अधिक देशात ओमिक्रॉनचा संसर्ग झाला होता. मात्र, भारतात आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता पहिला रुग्ण सापडल्याने देशातही संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे.
देशात गुरुवारी करोनाच्या (corona) २ हजार ३६४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं देशात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४,३१, २९, ५६३ झाली आहे. तर, उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्येत घट होऊन १५ हजार ४१९ इतकी झाली आहे. तर, गुरुवारी १० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात १९ डिसेंबर २०२०मध्ये १ कोटी रुग्ण सापडले होते. तर मागील वर्षी बाधित रुग्णांची संख्या दोन कोटींवर पोहोचली होती. २३ जून २०२१मध्ये तीन कोटीं करोना बाधित रुग्णांची संख्या झाली होती. तर, यावर्षी २६ जानेवारीला चार कोटींपर्यंत रुग्णसंख्या पोहोचली होती.