हेरवाडनंतर सातारा जिल्ह्यात विधवा प्रथा बंदचा पहिला ठराव
कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) हेरवाडनंतर विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव काल तांबव्यात घेण्यात आला. विधवा प्रथा बंद करण्याचा शासकीय अध्यादेश काढल्यानंतर सातारा जिल्ह्यातील (Satara District) पहिला ठराव झाल्याने तांबवेकरांचा (Tambave Village) विशेष गौरव होत आहे. येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक सभेत हा ठराव घेण्यात आला.मासिक बैठकीत उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील यांनी हा ठराव मांडला. त्यावर चर्चा होऊन ठरावाला सदस्या जयश्री कबाडे यांनी अनुमोदन दिल्यानंतर तो ठराव एकमताने मंजूरही करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने (Herwad Gram Panchayat) विधवा प्रथा बंदीच्या घेतलेल्या ठरावाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचाही ठराव झाला.या ठरावात म्हटले आहे, की आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यविधीवेळी, पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे, म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. आपल्या गावामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात येईल. त्यास या सभेने मंजुरी दिली.