हाताला रोजगार नसल्याने निवडला अवैध मार्ग
दिवसेंदिवस बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तरुणाई झटपट पैसे कमावण्याच्या नादात गुन्हेगारीकडे वळल्याची (Youth in Crime) अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाला रोजगार नसल्याने त्याने थेट बनावट नोटांच्या छपाईच्या (Fake Note Printing) अवैध मार्ग निवडल्याचे समोर आले आहे. उमेश चुडामण राजपूत असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. पहूर पोलिसांनी ही कारवाई केली. (Pahur Police Station) आरोपी उमेश हा जामनेर तालुक्यातील पुनर्वसित हिंगणा तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. तर त्याचे शिक्षण हे दहावीपर्यंत झाले आहे. त्याच्या वडिलांचेही निधन झाले आहे. तर आई, दोन भाऊ आणि बहिण असा त्याचा परिवार आहे.उमेश राजपूत हा एका कंपनीत रोजंदारीवर कामाला जायचा. दिवसाला 350 रुपये मिळायचे. मात्र, हे काम सतत नव्हते. कधी महिनाभर, तर कधी दोन महिनेच काम असायचे. यानंतर त्याला ब्रेक मिळायचा. यानंतर नेहमीसारखी बेरोजगारीची परिस्थिती, अशी उमेशची कहाणी होती. यामुळे त्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्याने थेट बनीवट नोटांच्या छपाईचा अैध मार्ग निवडला.उमेशने जळगाव येथून कागद खरेदी केले. तसेच अकरा हजाराचे कलर प्रिंटर खरेदी केले आणि हिंगणा येथे एका कुडाच्या घरात बनावट नोटा छापल्या. याप्रकरणी पहूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उमेशने पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्यासमोर प्रात्यक्षिक करुन दाखवले. त्याने प्रिंटरवर हुबेहुब पाचशेची नोट काढून दाखवली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, विनय सानप, गोपाल माळी, ज्ञानेश्वर ढाकणे, ईश्वर देशमुख, प्रकाश पाटील आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.आरोपी उमेश राजपूत याने मागील सहा महिन्यात पाच ते सात हजारांच्या बनावट नोटा चलनात आणल्या असण्याची शक्यता आहे. तसेच पळासखेडा मिराचे, पहुर, नेरी आणि जामनेर याठिकाणी बनावट नोटांचा उपयोग केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.