रशिया-युक्रेन युद्धात प्रथमच घडला असा प्रकार

युक्रेनच्या एका न्यायालयाने सोमवारी २१ वर्षीय सार्जंट वादिम शिशिमारिन या रशियन सैनिकाला युक्रेनच्या नागरिकाची हत्या केल्याच्या आरोपप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तीन महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर युद्धगुन्ह्यांसाठी प्रथमच अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Adv: मेगा समर डेज – ट्रेंडिंग गॅजेट्स आणि इतर उपकरणांवर भन्नाट डिल्स

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारताच ही हत्या करण्यात आली होती. शिशिमारिनला ईशान्येकडील सुमी प्रदेशातील एका गावात युक्रेनच्या नागरिकाच्या डोक्यात गोळी झाडल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. ज्या युक्रेनियन व्यक्तीला गोळी घालण्यात आली, तो फोनवर बोलत होता. त्याच्या फोनमुळे युक्रेनियन सैन्याला आपला ठावठिकाणा समजू शकतो, असे सांगत एका अधिकाऱ्याने आपल्याला त्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते, असे शिशिमारिनने न्यायालयात कबूल केले होते.

तीन महिन्यांच्या या युद्धामुळे जगभरातील विस्थापितांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असताना, ही शिक्षेची माहिती समोर आली आहे. जगभरातील एक कोटी नागरिकांना आपले घरदार सोडावे लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष व्लजिमिर झिल्येन्स्की यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू झालेल्या जागतिक आर्थिक मंचाला संबोधित करताना, रशियावर जास्तीत जास्त निर्बंध घालण्याची मागणी केली. त्यांनी पाठवलेल्या व्हिडिओ संदेशाद्वारे, रशियाची आक्रमकता रोखण्यासाठी आणखी आर्थिक निर्बंध लावणे गरजेचे आहे, असे सांगत इंधनबंदीचे पाऊल उचलावे, असे आवाहन केले. तसेच सर्व बँकांनी व्यवहार गोठवले असून, रशियाशी असेलेले व्यापारी संबंध पूर्णपणे तोडून टाकल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोमवारी टोकियोमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी युक्रेनवर मॉस्कोच्या आक्रमणाचा निषेध केला. बायडेन यांनी रशियन हल्ल्यापासून बचावासाठी युक्रेनला आणखी ४० अब्ज डॉलर देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *