भाजपला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, एकत्र लढणार?

राज्यात लवकरच मिनी विधानसभा (Mini Assembly Election) अशी ख्याती असलेल्या महापालिका निवडणुकीचा (Election) बिगूल वाजणार आहे. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. यामध्ये नवी मुंबईचा (Navi Mumbai) देखील समावेश आहे. नवी मुंबई महापालिकेची देखील येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्र लढणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकत्र निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित होते. या बैठकीत 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. आता या बैठकीचा निर्णय प्रदेश पातळीवर पाठवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील अनेक महापालिकांचा कार्यकाळ संपून बरीच महिने लोटली आहेत. कोरोना संकट आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नामुळे या निवडणुका (Election) आतापर्यंत रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी करताना काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिला. पण त्यावर निवडणूक आयोगाने पावसाचं कारण सांगितलं. त्यावर सर्वोच्च न्यायालायने ज्या भागात पाऊस पडणार नाही त्याठिकाणी तातडीने जून महिन्यात निवडणुका घ्या, असे आदेश दिले. त्यामुळे राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजण्याचे चिन्हं आहेत.

सर्वच पक्ष कामाला लागले

दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत गेल्या दोन आठवड्यात दोन पेक्षा जास्त जाहीर सभा झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील जाहीर सभा घेतली. त्यांची औरंगाबादमध्येही जाहीर सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यादेखील सभा झाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यादेखील सभा सुरु आहेत. आगामी काळात या सभा आणखी वेगाने होते. राज्यात आगामी काळात निवडणुकीची प्रचंड मोठी रणधुमाळी बघायला मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *