सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा मंगळवारी दुपारी छापा

(crime news) येथील कोल्हापूर रस्त्यावर खिलारे मंगल कार्यालयाजवळ एका दुकान गाळ्यात बेकायदा घरगुती सिलिंडराचा साठा करून त्यातील गॅस रिक्षामध्ये भरून देणार्‍या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी दुपारी छापा टाकला.

छाप्यामध्ये मुख्य संशयितांसह सहा रिक्षाचालकांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 19 सिलिंडर, गॅस भरून देण्यासाठी वापरण्यात येणार्‍या चार इलेक्ट्रीक मोटारी, पाच रिक्षा व चार वजन काटे, असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्यांमध्ये मुख्य संशयित सिद्धिविनायक सदाशिव देशिंगे (वय 32, रा. नदीवेस, पवार गल्ली, मिरज), सूरज बाळू काटकर (वय 22), रिक्षाचालक कौशल संजय जाधव (वय 20), राकेश विनायक कांबळे (वय 21), वजीर नियामत जमादार (वय 20, चौघेे रा. शामरावनगर, सांगली), संजय ऊर्फ सचिन रमेश पवार (वय 38, रा. संजयनगर सांगली), नागेश तुकाराम ऐवळे (वय 32, रा. पत्रकारनगर सांगली), अमित आप्पासाहेब तांदळे (वय 30, रा. गजराज कॉलनी, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार आर्यन देशिंगकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. (crime news)

पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, हवालदार मेघराज रुपनर, अरूण औताडे, हेमंत ओमासे, आर्यन देशिंगकर, संदीप पाटील यांचे पथक मंगळवारी कोल्हापूर रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी खिलारे मंगल कार्यालयाजवळ समर्थ कॉलनीत नरगुंदे यांच्या दुकान गाळ्यात संशयित सिद्धिविनायक देशिंगे हा रिक्षामध्ये बेकायदा गॅस भरून देत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तिथे जाऊन छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताचा देशिंगेसह रिक्षा चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात
आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *