शरद पवार आणि बृजभूषण सिंहांच्या भेटीचा आणखी एक फोटो व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यातील भेटीचा आणखी एक फोटो समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी हा फोटो ट्विट केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्याला खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर अयोध्या दौरा रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होण्यामागे कोणीतरी सापळा रचल्याचा आरोप केला होता.
या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांकडून शरद पवार (Sharad Pawar) आणि बृजभूषण सिंह यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द होण्यात शरद पवार यांचाच हात आहे, असे मनसेकडून सुचित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, बृजभूषण सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तरीही मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या भेटीला नवा फोटो ट्विट करण्यात आला आहे. आता ही बैठक कधी झाली आणि अशा किती बैठका झाल्या, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मनसेच्या नेत्यांनी अलीकडेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि बृजभूषण सिंह यांचा एक फोटो पोस्ट करून आरोप केले होते. शरद पवार आणि माझा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो हा तीन वर्षांपूर्वीचा असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावेळी बृजभूषण सिंह यांनी शरद पवार यांच्यासोबत आपले संबंध असल्याची जाहीर कबुली दिली. आजही आमचे संबंध आहेत. मला त्यांना भेटायचे असेल तर आम्ही लपुनछपून भेटणार नाही. ते मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन. शरद पवार हे देशातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडून काही गोष्टी शिकाव्यात, असा सल्लाही बृजभूषण सिंह यांनी दिला होता.