राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचाच गडी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेने कोल्हापूरच्या उमेदवारांची नावे चर्चेत ठेवल्यामुळे या निवडणुकीत कोल्हापूर केंद्रबिंदू ठरला आहे. उमेदवारी कुणालाही दिली, तरी खासदार कोल्हापूरचा होण्याची शक्यता बळावल्याने कोल्हापुरात सध्या उत्सुकता वाढली आहे. कोल्हापुरातील संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक आणि संजय पवार या तीन नावांभोवती राज्यसभेची उमेदवारी फिरत असल्यामुळे लॉटरी कुणाला लागणार याची उत्सुकता आहे.

राज्यसभेसाठी सहा जागा निवडून देण्यात येणार आहेत. त्यातील वादग्रस्त सहाव्या जागेसाठी शिवसेनेने प्रथम संभाजीराजे यांना पसंती दिली होती. मात्र त्यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिल्याने कोल्हापूरचे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याची घोषणा झाली. या पाठोपाठ आता याच जागेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित केली आहे. राज्यसभेची सहावी जागा सध्या कोल्हापूरभोवती फिरत असल्याने राज्यात कोल्हापूरला राजकीय महत्त्व आले आहे.

सेनेच्या वतीने कोल्हापूरच्या दोन नावांची चर्चा सुरू असताना आता भाजपनेही या जागेसाठी कोल्हापूरच्या उमेदवाराचे नाव पुढे केले आहे. यातून सहाव्या जागेसाठी माजी खासदार आणि पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना उमेदवारी दिली, संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि शिवसेनेने संजय पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली तर निवडून कोणीही येवो विजय मात्र कोल्हापूरचा होणार आहे. यामुळे कोल्हापुरची मात्र राजकीय ताकद वाढणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.

योगायोगाने जर तिघेही विविध पक्षातून खासदार झाले तर मात्र कोल्हापूर हे राजकीय घडामोडीचे मोठे केंद्र बनण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसच्या वतीनेही संभाजीराजे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. तसे झाल्यास ते काँग्रेसचे, महाडिक भाजपचे आणि पवार शिवसेनेचे असे तीन खासदार कोल्हापूरला मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात राज्यभर चर्चेत असलेल्या या महत्त्वाच्या पदावर एकाच जिल्ह्यात तिघांची नावे निश्चित होण्याची शक्यता दिसत नाही, पण राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. पवार यांची उमेदवारी हा त्याचाच एक भाग आहे. यामुळे राजकीय घडामोडी कडे कोल्हापूरकरांचे लक्ष अधिक लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *