फ्रीजमध्ये तुम्ही अन्न चुकीच्या पद्धतीनं तर ठेवत नाही ना? जाणून घ्या योग्य पद्धत

घरातील बऱ्याच वस्तूंप्रमाणे फ्रीज हीदेखील चैनीची नव्हे तर गरजेची वस्तू झाली आहे. कारण रोजच्या धावपळीत प्रत्येकवेळी ताजं जेवण बनवायला वेळ मिळेल असं नाही. त्यामुळे अनेकजण उरलेलं जेवण, एखादा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र बऱ्याचवेळा आपण फ्रीजमध्ये ठेवलेला पदार्थ पुन्हा खाताना त्याची चव बदल्यासारखी वाटते, व तो पदार्थ आपण फेकून देतो. पण तुम्ही जर फ्रीजमध्ये पदार्थ ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्यावर फ्रीजमध्ये ठेवलेला पदार्थ फेकून देण्याची वेळ येणार नाही

फ्रीज हा आता घराचा एक महत्त्वाचा भागच बनला आहे. ज्याचा उपयोग अन्न ताजं ठेवण्यासाठी, पाणी गोठवून बर्फ करण्यासाठी आणि पाणी थंड करण्यासाठी केला जातो. त्यामुळे रेफ्रिजरेटर स्वच्छ करण्यापासून तो योग्य प्रकारे कसा वापरायचा, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बर्‍याचदा तुमच्या लक्षात आलं असेल, की जेव्हा तुम्ही अन्न फ्रीजमध्ये बराच वेळ ठेवल्यानंतर त्याची चव बदलते. फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न खराब झालं असून, त्यात जंतू तर गेले नाहीत ना, अशी भीतीही अनेकवेळा वाटते. तर, कधीकधी अन्न फेकून द्यावं लागतं; पण बऱ्याचवेळा हे तुमच्याच चुकीमुळे घडतं. त्यामुळेच फ्रीजमध्ये एखादा पदार्थ ठेवताना कोणत्या चुका करू नयेत, ते जाणून घेऊयात.

ओल्या भांड्यात अन्न ठेवणं – 

जर तुम्ही अन्न हे एखाद्या भांड्यात फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर ते भांडं ओलं नसल्याची खात्री करा. त्या भांड्यात पाण्याचा एक थेंब राहणार नाही, याची काळजी घ्या. कारण ओलेपणामुळे अन्नाची चव खराब होते. विशेषतः भाजी खराब होते, सडते, व ती खाण्यास योग्य राहत नाही. त्यामुळे अशी चूक न केलेलीच बरी.

फ्रीजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पदार्थ ठेवू नका –

फ्रीजचं काम अन्नाचं संरक्षण करणं आहे. परंतु, जर तुम्ही त्याचा वापर डस्टबिन म्हणून करू लागलात, तर नुकसान होणं निश्चितच आहे. बरेच लोक फ्रीजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ ठेवतात, ज्यामुळे अन्नाची चव एकमेकांमध्ये थोडीशी मिसळते.

न झाकता अन्न ठेवणं – 

फ्रीजमधील अन्नामध्ये किडे, कोळी किंवा माशी पडणार नाही, असे आपल्याला वाटते. त्यामुळे अन्न झाकून न ठेवता फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु फ्रीजमध्ये पदार्थ ठेवण्याची ही योग्य पद्धत नाही. कारण असे केल्यास फ्रीजमधील थंड तापमानामुळे अन्नावर थर तयार होऊ लागतो, त्याशिवाय न झाकलेल्या अन्नाचं तापमान कमी राहिल्यानं पदार्थाची चव खराब होते.

फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवताना थोडी काळजी घेतली, तर हे अन्नपदार्थ खराब होणार नाहीत. फक्त त्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *