कोल्हापूर : पतीनं पत्नीसह काढला प्रियकराचा काटा
(crime news) अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. अक्कतंगेरहाळ (ता. गोकाक ) येथे मंगळवारी (ता. ४) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
त्यानंतर संशयित स्वतःहून पोलिसांना शरण गेला. रेणुका यल्लाप्पा माळगी (वय ४५) व मल्लिकार्जुन यल्लाप्पा जगदार (४०, दोघेही रा. अक्कतंगेरहाळ) अशी मृतांची नावे आहेत. यल्लाप्पा लक्काप्पा माळगी (४५, रा. अक्कतंगेरहाळ) असे संशयिताचे नाव आहे.
अंकलगी पोलिसांनी (Ankalgi Police) गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. याबाबत अंकलगी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : माळगी जगदार (मृत) व जगदार कुटुंब एकाच गल्लीत राहत होते. याआधी या कुटुंबात कोणत्याही प्रकारचे भांडण-तंटे नव्हते.
मात्र, काही दिवसांपासून रेणुका व मल्लिकार्जुन यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय यल्लाप्पाला येत होता. त्यातून मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास यल्लाप्पाने पत्नी रेणुका हिला जाब विचारला. त्यातून दोघांत जोरदार भांडण झाले. त्या रागातून यल्लाप्पाने रेणुकावर कोयत्याने वार केला. घाव वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. (crime news)
यल्लाप्पा तेथून मल्लिकार्जुनच्या घरी गेला. परसात अंघोळ करीत असलेल्या मल्लिकार्जुनच्या मानेवर त्याने काही कळायच्या अगोदरच वार केला. त्यामुळे मल्लिकार्जुनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर यल्लाप्पा स्वतःहून अंकलगी पोलिसांना शरण गेला. याप्रकरणी माला मल्लिकार्जुन जगदारने फिर्याद दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तपासासंदर्भात सूचना केल्या.