जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पडीक
वन्यप्राण्यांचा अधिवास संरक्षणाचा दर्जा वाढल्याने जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, अगदी सहजपणे वन्यप्राणी शेतात घुसखोरी करून उभी पिके फस्त करीत आहेत. परिणामी, जंगलालगत शेती करणे धोक्याचे तसेच नुकसानीचे ठरत असून हजारो हेक्टर शेतजमीन वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे अनेकांनी पडीक ठेवली आहे. आजरा, चंदगड, भुदरगड व राधानगरी तालुक्यात अधिक जमीन पडीक (fallow) असल्याचे चित्र आहे.
राधानगरी आणि दाजीपूर या दोन मोठ्या अभयारण्यांसोबत कोल्हापूर वनवृत्तात कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोली पर्यंतच्या वनक्षेत्रात अनेक वन्यप्राणी व दुर्मीळ वनस्पतींची नोंद आहे. रात्रीबरोबरच दिवसाही वन्यप्राणी जंगल सोडून खासगी क्षेत्रात दिसत आहेत. गव्यासारख्या वन्यप्राण्याच्या कळपाने शेतातून एखादी फेरी मारली तरी उभे पीक आडवे होते. परिणामी, जंगल क्षेत्रालगत असलेली शेती करणे डोकेदुखी ठरत आहे. आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यात गवे, हत्तींकडून ऊस, भात, भुईमूग, नाचणा पिकांबरोबरच फणस, नारळ, केळी आदीसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचाच परिणाम शेतीवर झाला आहे.
जिल्ह्यातील अंदाजे आजरा 160 हेक्टर, चंदगड 180 हेक्टर, भुदरगड 150 हेक्टर, राधानगरी 120 हेक्टर, शाहूवाडी 115 हेक्टर, गगनबावडा 90 हेक्टर व पन्हाळा तालुक्यातील 100 हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन पडीक (fallow) आहे. अनेक वर्षांपासून या तालुक्यात पिकांची रात्रीची राखण केली जाते; पण त्यालाही वन्यप्राणी दाद देत नसल्याने शेतकर्यांमध्येही भीती निर्माण झाली आहे.