‘घड्याळाने काटा काढला, की काट्याने घड्याळ काढले हेच कळत नाही’
(political news) ‘महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला प्रकार किसळवाणा आहे. या किळसवाण्या प्रकाराची सुरुवात शरद पवार यांनी १९७८ साली पुलोदचा प्रयोग करून केली होती, आता शेवटही त्यांच्याकडेच जात आहे,’ अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या प्रकाराबाबत मी लवकरच मेळाव्यात सविस्तर भूमिका मांडणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राज्यातील झालेला प्रकार किळसवाणा असून, हा मतदारांचा अपमान आहे. एका दिवसात हा प्रकार घडलेला नाही. त्याचे व्यवस्थित नियोजन आधीच सुरू असणार. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहेत. या प्रकाराबाबत राज्यातील प्रत्येक घरात घरात फक्त शिव्या ऐकू येतील.’
‘घड्याळाने काटा काढला की..’
‘सध्या कोणता नेता, कोणत्या पक्षात आहे हे काहीच सांगता येत नाही. कॅरमचा डाव इतका विचित्र फुटला आहे की, कोणत्या सोंगट्या कोणत्या बाजूला गेल्या आहेत हेच सांगता येत नाही,’ अशी टीका ठाकरे यांनी केली. तसेच, ‘घड्याळाने काटा काढला, की काट्याने घड्याळ काढले हेच कळत नाही,’ असे ठाकरे म्हणाले. (political news)
‘सर्व अनाकलनीय’
प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील ही अजित पवारांसोबत जाणारी माणसे नाहीत. मात्र, तरीही ते तिकडे आहेत, हे सर्व अनाकलनीय आहे. या गोष्टी बहुधा पवारांनीच पेरल्या असाव्यात. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून दिसल्या तरी आश्चर्य वाटणार नाही, असे राज ठाकरे या वेळी नमूद केले.