पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ‘ही’ घाेषणा

एक वर्षापूर्वी लोक विचारत असत की, भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक का करावी? आता मात्र विचारत आहेत की, भारतात गुंतवणूक का करू नये? आज भारताचा जगातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनात वाटा वाढला आहे. देशात सेमीकंडक्टर उत्पादनासाठी पायाभूत उभारणी करण्यात येत आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकार (government) तंत्रज्ञान कंपन्यांना ५० टक्के अर्थसाहाय्य देईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.

गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सेमीकॉन इंडिया २०२३’ संमेलनाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. हे संमेलन तीन दिवस चालणार आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्राच्या विकासासाठी ‘सेमीकॉन इंडिया’च्या माध्यमातून आम्ही प्रोत्साहन देत होतो. त्यात आता वाढ करण्यात आली असून या प्रकल्पांसाठी ५० टक्के अर्थसाहाय्य दिले जाईल. भारतात सेमीकंडक्टर उद्योग तेजीने वाढत आहे. जगाला एक विश्वासपात्र चिप पुरवठा साखळीची गरज आहे. आजपर्यंत झालेली प्रत्येक औद्याेगिक क्रांती लाेकांच्या महत्त्वाकांक्षांनी प्रेरित हाेती. आता चाैथी औद्याेगिक क्रांती हाेऊ घातली असून ती भारताच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित आहे, असे नरेंद्र माेदी यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)

गांधीनगर येथे ‘सेमीकाॅन इंडिया’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘व्हीआर इंटरॲक्टिव्ह’ उपकरणाचा अनुभव घेतला.

डिझाइनसाठी अभ्यासक्रम

सेमीकंडक्टर डिझाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय सरकारने (government) घेतला आहे. त्यासाठी ३०० विद्यार्थ्यांची निवडही करण्यात आली आहे. चौथी औद्योगिक क्रांती भारताच्या आकांक्षांनी प्रेरित असेल.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

एएमडी करणार ३२ हजार कोटींची गुंतवणूक

जागतिक सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘एएमडी’ पुढील ५ वर्षांत भारतात ३२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या वतीने ही घोषणा ‘सेमीकॉन इंडिया’ संमेलनात करण्यात आली.

वेदांताला मिळाला नवा भागीदार

वेदांता समूहास नवा तांत्रिक भागीदार मिळाला आहे, अशी माहिती वेदांता समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी याप्रसंगी दिली. दोन्ही कंपन्या करार करण्याच्या प्रक्रियेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मायक्रॉन देणार १५ हजार नोकऱ्या

मायक्रॉनचे सीईओ संजय मेहरोत्रा यांनी सांगितले की, भारतातील सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये उभा राहणार आहे. यातून १५ हजार नव्या नोकऱ्या निर्माण होतील.

भागीदारी कायम राहील : फॉक्सकॉन

तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे चेअरमन यंग लियू यांनी सांगितले की, तैवान हा भारताचा सर्वाधिक विश्वसनीय भागीदार असून ही भागीदारी भविष्यातही कायम राहील.

संमेलनात फॉक्सकॉन, मायक्रॉन, एएमडी आणि आयबीएम यांसह अनेक बड्या चिप निर्माता कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *