टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये होणार मोठा बदल, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी?
(sports news) रविवारी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील स्थान अगोदरच निश्चित करणाऱ्या भारताचा आज आव्हान संपुष्टात आलेल्या बांगलादेशविरुद्ध सामना होत आहे. भारतासाठी हा सामना फायनलच्या तयारीचा असला, तरी विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज राखीव खेळाडूंना संधी मिळू शकते.
भारत आणि बांगलादेशदरम्यान ४० एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यातील सात सामने बांगलादेशने जिंकले आहेत आणि दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. बाकीचे सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत, पण २००७ मधील एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला बांगलादेशने पराभूत केले होते. तेव्हापासून बांगलादेश संघ भारताला पराभूत करू शकतो या थाटातच मैदानात उतरतो.
आशिया कप स्पर्धेत म्हणायला गेले तर बांगलादेश संघाचा खेळ अपेक्षेप्रमाणे झाला नाहीय. त्यांचे सुपर फोरमधले आव्हान संपले आहे. तरीही भारतासमोर सामना म्हटल्यावर भारताला टक्कर देण्याची एक प्रकारची खुमखुमी त्यांच्या संघात दिसत आहे.
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चढ्या क्रमाने चांगली होत चालली आहे. बरोबर उलटी गत बांगलादेश संघाची आहे. चालू स्पर्धेत बांगलादेशी फलंदाजांची खराब कामगिरी संघाला अडचणीत टाकून गेली आहे. त्यातून भारतासमोरच्या सामन्यात मुश्फीकूर रहीम खेळायची शक्यता कमी आहे. (sports news)
भारतीय संघ मात्र शेवटचा सुपर फोरचा सामना काही गोष्टींची तपासणी करायला खेळेल असे समजते आहे. भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी संघ काही नवीन खेळाडूंना खेळायची संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सूतोवाच केले.
गुरुवारी भारतीय संघातील पाच खेळाडूंनी सराव केला. श्रेयस अय्यर सरावाला आला होता आणि त्याने बराच काळ फलंदाजीचा सराव केला, ज्यात त्याच्या पाठीत भरलेली उसण बरी झाल्याचे दिसत होते. एकदाही सरावादरम्यान श्रेयसने काही दुखत असल्याची तक्रार केली नाही. म्हणजेच बांगलादेशसमोर श्रेयस अय्यर खेळेल असे वाटते. जसप्रीत बुमराह किंवा सिराजला विश्रांती देताना मोहम्मद शमी खेळायची दाट शक्यता वाटते.
प्रेमदासा मैदानावर खेळलेल्या दोन सामन्यांत दोन प्रकारच्या खेळपट्ट्या बघायला मिळाल्या त्याविषयी प्रश्न विचारता पारस म्हांबरे म्हणाले, पाकिस्तानसमोरच्या सामन्याच्या वेळी खेळपट्टीवर गवत होते म्हणून चेंडू चांगला बॅटवर येत होता. श्रीलंकेसमोर खेळताना खेळपट्टीवर गवत नव्हते. त्यातून कर्मचाऱ्यांना खेळपट्टी तयार करायला वेळ न मिळाल्याने पाणी मारता आले नव्हते. परिणामी कोरडेपणा जाणवत होता. त्यामुळेच फिरकीला साथ मिळत होती. एक नक्की आहे, भारतीय संघ त्याचा अभ्यास करून अंदाज घेऊन संघ मैदानात उतरवत आहे.