शिक्षक बँक; सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी
प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत (annual meeting) 2022-23 चा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रक मंजुरी व अमृत संजीवनी योजनेवरुन सत्ताधारी, विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने काहीकाळ गोंधळ झाला. विरोधकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांना चांगलेच धारेवर धरले.
प्राथमिक शिक्षक बँकेची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. व्हा. चेअरमन शिवाजी बोलके यांनी स्वागत केले. चेअरमन सुनील एडके यांनी प्रास्ताविकात विरोधकांच्या कारभाराचे वाभाडे काढले. 700 कोटी रुपयांच्या ठेवी, स्व-मालकीच्या शाखा इमारती, कोअर बँकिंग, मोबाईल अॅप सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
सीईओ मगदूम यांनी नोटीस वाचन केले. गेल्या वर्षीच्या सभेत (annual meeting) ताळेबंद चुकीचा व नफा बरोबर असल्याचे सीईओने सांगितले, असे श्रीकांत चव्हाण म्हणाले. यावरून गोंधळास सुरुवात झाली. संभाजी बापट यांनी आक्षेप घेत ताळेबंद चुकीचा आहे, मग वापर का केला?, सीईओ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. प्रसाद पाटील यांनी सीईओ यांनी ताळेबंद खोटा ठरविला. ताळेबंद नामंजूर व नफा मंजूर हे कोणत्या सहकार कायद्यात बसते, असे सांगत सीईओंना धारेवर धरले. ताळेबंद खोटा ठरविणारे सीईओ पदावर कसे राहतात. तुमच्या हातात माईक आहे म्हणून काहीही चालणार नाही, असे खडेबोल राजमोहन पाटील यांनी चेअरमन यांना सुनावले. यावर चेअरमन यांनी चुकीचे काही केले असल्यास राजकारणातून निवृत्ती घेतो, असे उत्तर दिले. संदीप मगदूम यांनी खोटा नफा दाखविल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी केली. यावर चेअरमन एडके यांनी नोकरभरतीसह सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल व दोषींकडून शंभर टक्के वसुलीचे आश्वासन सभेस दिले.
सभासद निवासस्थानाची अवस्था वाईट आहे. संचालकांप्रमाणे सभासदांचे निवासस्थान असावे, सभासदांना सभेसाठी प्रवास भत्ता मिळावा, बँक कर्ज प्रकरणी जामीनदाराबाबत कोल्हापूर व परजिल्हा असा भेदभाव करू नये, अशी सूचना व मागणी काही सभासदांनी केली. यावर चेअरमन यांनी जामीनदार नियमात बदल, सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही दिली. अमृत संजीवनी योजनेवरून 50 हजार रुपये कायम ठेवीतून घेऊ नये, अशी भूमिका विरोधकांनी घेतल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. हा विषय सभासदांसमोर मांडावा, अशी मागणी सभासदांनी केली. अखेर गोंधळात विषय मंजूर केला गेला. शासनाच्या कंत्राटी भरती धोरण निषेधाचा ठराव प्रमोद तौंदकर यांनी मांडला. त्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. उशिरापर्यंत चाललेल्या सभेत विविध विषय मंजूर करण्यात आले.
मळ्याचे रान विकले अन् माळाचे घेतले
विरोधकांनी मागील काही वर्षांत बँकेचा कारभार करताना सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापून खाल्ली, त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. सरकारी कर्ज रोखे विक्री, नोकरभरतीमुळे याचा परिणाम भविष्यकाळात भोगावा लागणार आहेत. विरोधकांनी मळ्याचे रान विकून माळाचे रान घेतल्याची टीका चेअरमन एडके यांनी केली.