पाटील-महाडिक गटात वाद उफाळताच ‘गोकुळ’च्या राजकारणात शिंदे, दादा गटाची गोची

जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) राजकारणात (Gokul Dudh Sangh) काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) विरुध्द माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गटातील वाद (dispute) पुन्हा उफाळला आहे.

या वादात ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडवताना विरोधात असलेल्या, पण आता भाजपसोबत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेते व संचालकांचीही मात्र चांगलीच गोची झाली आहे. या वादात बाजू कोणाची घ्यायची हा त्यांच्या समोरचा प्रश्‍न आहे.

विधानसभा, विधान परिषद व लोकसभेतील पराभवानंतर महाडिक यांच्या गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महाडिक यांची ३२ वर्षांची सत्ता उलथवून टाकत पाटील व मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलने सत्तांतर घडवले. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि त्यात पाटील व मुश्रीफ हे मंत्री होते.

त्यांच्या जोडीला ‘जनसुराज्य’ चे आमदार डॉ. विनय कोरे, सेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, के. पी. पाटील यांची साथ होती. गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेतच फूट पडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच सेनेतून ४० आमदार घेऊन बाहेर पडले. आता ‘गोकुळ’च्या राजकारणातील आबिटकर, नरके यांनी शिंदेंना साथ दिली.

जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही भूकंप झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या मागून जिल्ह्यातील मंत्री मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि नाही नाही म्हणत शेवटच्या क्षणी के. पी. पाटील यांनी अजित पवार गटासोबत जाणे पसंत केले. राज्याच्या राजकारणात कोरे व आमदार प्रकाश आवाडे सध्या भाजपसोबतच आहेत तर शिंदे व अजितदादा गटही भाजपसोबत आहे.

‘गोकुळ’ च्या सत्तांतरापासून संघाच्या कथित गैरकारभारावरुन संचालिका शौमिका महाडिक यांनी रान उठवले आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून संघाच्या चाचणी लेखा परीक्षणाचे आदेश झाले आहेत. राज्यात सत्तेत नसल्याने आमदार सतेज पाटील यांना यात काहीही करता आलेले नाही. सुरचवातीच्या काळात महाडिक यांच्या आरोपावर श्री. मुश्रीफ यांची साथ श्री. पाटील यांना होती. पण, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत मोठा राडा होऊनही मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना श्री. महाडिक यांच्यावर थेट निशाणा साधलेला नाही.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत कोरे हे महाडिक यांच्यासोबत राहिले. आता ‘गोकुळ’च्या राजकारणात पाटील विरुध्द महाडिक असा वाद (dispute) पेटला असताना शिंदे किंवा अजित पवार गटाच्या नेते व संचालकांनाही थेट भूमिका घेण्यात अडचणी येत आहेत. सतेज पाटील यांना साथ द्यावी तर आपला नेता भाजपसोबत आहे, विरोधात बोलावे तर नेत्यांचीच भूमिका स्पष्ट नाही, अशा विचित्र कात्रीत हे संचालक सापडले आहेत.

‘त्या’ संचालकांचेही मौनच

‘गोकुळ’च्या निवडणुकीत त्यावेळच्या सत्तारूढ पॅनेलमधून शौमिका महाडिक यांच्यासह अंबरिश घाटगे, बाळासाहेब खाडे, चेतन नरके विजयी झाले आहेत. ‘गोकुळ’ च्या कारभारावर सातत्याने एकीकडे महाडिक या आवाज उठवत असताना त्यांना या तीन संचालकांची साथ मिळत नाही. या तीन संचालकांचे मौनच ते कोणाकडे आहेत हे सांगून जाते.

नेते आणि त्यांचे संचालक अजित पवार गट

मंत्री हसन मुश्रीफ : अरुण डोंगळे, नाविद मुश्रीफ, युवराज पाटील

ए. वाय. पाटील : किसन चौगले,

के. पी. पाटील : रणजितसिंह पाटील

शिंदे गट

आमदार प्रकाश आबिटकर : अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे

चंद्रदीप नरके : अजित नरके, एस. आर. पाटील

सुजित मिणचेकर

डॉ. विनय कोरे : अमरसिंह यशवंत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *