पाटील-महाडिक वादात मुश्रीफांची उडी
(political news) गोकुळच्या कारभारावरून जिल्ह्यात गाजत असलेल्या आ. सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या संघर्षात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उडी घेतली आहे. सत्तांतरानंतर पाटील-महाडिक वादापासून मुश्रीफ आतापर्यंत थोडे अंतर ठेवूनच होते. त्यांच्यात सुरू असलेल्या आरोप, प्रत्यारोपाबद्दल विचारले की मुश्रीफ आपल्यासमोरील माईक आ. पाटील यांच्याकडे सरकवत त्यांना ‘तुम्ही बोला म्हणून खुणवायचे; परंतु आता मुश्रीफ यांनी त्यांच्या वादात उतरत थेट महाडिक यांच्यावर निशाणा साधला आहे. मुश्रीफ यांनी गोकुळची बदनामी थांबविण्याच्या दिलेला इशार्यामुळे गोकुळच्या दुधाला आणखी उकळी फुटणार आहे.
जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेल्या गोकुळमधील महाडिक गटाची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी गेल्या दोन दशकामध्ये जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यामध्ये कोणाला यश आले नाही. आ. सतेज पाटील मात्र त्याला अपवाद ठरले. त्यांनी सन 2015 मध्ये प्रथम गोकुळच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल करून महाडिकांना आव्हान दिले. एकटे असूनही त्यांनी चांगली लढत दिली. त्यानंतर पाच वर्षे आ. पाटील यांनी सतत गोकुळच्या कारभारावर टीकेची झोड उठवत गोकुळला चर्चेत ठेवले. त्याचा फायदा त्यांना 2021 च्या निवडणुकीत झाला. गोकुळमध्ये सत्तांतर झाले, त्याला मंत्री हसन मुश्रीफ यांची साथही महत्त्वाची ठरली. या निवडणुकीत मुश्रीफ यांनी उघडपणे पाटील यांना साथ दिली.
आ. पाटील यांना साथ देत असताना मुश्रीफ यांनी मात्र गोकुळच्या निवडणुकीत आणि सत्तांतर झाल्यानंतरही गोकुळमधील पाटील-महाडिक यांच्या वादापासून आतापर्यंत अंतर ठेवूनच राहणे पसंत केले आहे. शौमिका महाडिक यांनी केलेल्या आरोपांना किंवा उपस्थित केलेल्या प्रश्नांवर कधीही त्यांनी भाष्य केले नाही. ज्यावेळी असा प्रसंग येईल त्यावेळी त्यांना आ. पाटील यांच्याकडे बोट दाखवत बाजूला राहण्याचा प्रयत्न केला आहे. महाडिक गटाकडूनही मुश्रीफ यांच्यावर कधी आरोप केले नाहीत.(political news)
गोकुळमधील राजकारण तापण्याची शक्यता
गोकुळच्या नुकत्याच झालेल्या सभेत गोंधळ झाला. सत्तांतरानंतरही गोकुळच्या सभेतील गोंधळाची परंपरा विरोधी आघाडीने कायम ठेवली आहे. यामुळे गोकुळची बदनामी होत असल्याचा समज मुश्रीफ यांचा झाल्यामुळे त्यांनी आता नाव न घेता महाडिक यांच्यावर निशाणा साधला आहे. गोकुळची बदनामी थांबविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुश्रीफ यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख कोणाकडे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. या निमित्ताने गोकुळमधील पाटील-महाडिक यांच्या वादात मुश्रीफ यांची एंट्री झाल्यामुळे गोकुळमधील राजकारण अधिकच तापण्याची शक्यता आहे.