गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना

गणेशमूर्ती घरात घेत असताना चौकटीचा धक्का लागू नये म्हणून खाली वाकताना पाय घसरून फरशीवर पडल्याने बोलकेवाडी (ता. आजरा) येथील सचिन शिवाजी सुतार (42) यांचा मृत्यू (death) झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सुतार हे मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होते. गणेशोत्सवासाठी ते सोमवारी गावी आले होते. मंगळवारी सकाळी त्यांनी गावातून गणेशमूर्ती आणली. डोक्यावरून मूर्ती घरात नेत असताना चौकटीचा अडथळा होत होता. यामुळे ते खाली वाकले. याचवेळी दारातील फरशीवरील शेवाळावरून त्यांचा पाय घसरला. डोक्यावर जोराने आदळून ते बेशुद्ध पडले.

तातडीने आजरा येथील खासगी दवाखान्यात नेले असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू (death) झाल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी सकाळी गणेशाची प्रतिष्ठापना करून सायंकाळी ते मुंबईला जाणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *