“याबद्दल माझं थेट आणि स्पष्ट…”; मोदींचा उल्लेख करत कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडोंचं विधान

कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात थेट भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान (Prime Minister) जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा त्याच वादग्रस्त विधानाचा उल्लेख केला आहे. न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेमध्ये ट्रूडो यांनी, भारताने हे आरोप गंभीर्याने घ्यावेत आणि आमच्यासोबत काम करावं असं म्हटलं आहे.

फार विचार करुन केलं ते विधान

ट्रूडो यांनी पत्रकारांसमोर बोलताना, मी यापूर्वी सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्हाला ठोस पुरावे मिळाले आहेत की या घटनेमागे (निज्जरच्या हत्येमागे) भारत सरकारचा हात आहे. मला वाटतं की एका निष्पक्ष न्यायव्यवस्था असलेला देश म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आपण फार प्रमाणिकपणे यावर काम केलं पाहिजे. मी पुन्हा सांगू इच्छितो की, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हे आरोप सर्वांसमोर करण्याचा निर्णय फार गांभीर्याने विचार करुन घेण्यात आला.

आम्ही ते सहन करणार नाही

कायद्याचं पालन करणारा देश म्हणून आमची ही जबाबदारी आहे की आम्ही निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी. आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करतो हे अधोरेखित करणं गरजेचं आहे. आमच्या देशामध्ये आमच्या नागरिकाची हत्या करण्यामागे दुसऱ्या देशाचा हात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, असं ट्रूडो यांनी म्हटलं आहे.

मोदींचाही केला उल्लेख

ट्रूडो यांनी भारतीय पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीदरम्यानही या विषयावर चर्चा केल्याचा दावा केला. “याबद्दल माझं थेट आणि स्पष्ट बोलणं (भारतीय) पंतप्रधानांबरोबर (मोदींबरोबर) झालं होतं. त्यावेळी मी त्यांच्यांशी या प्रकरणावर बोललो होतो. भारताचे हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं अशी आमची इच्छा आहे. पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने चौकशी करुन न्याय देण्याच्या दृष्टीने दोघांनी मिळून काम केलं पाहिजे. आम्ही कायद्याचं पालन करणारा देश आहे. आम्ही कॅनडामधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक आवश्यक पाऊल उचलण्यास तयार आहोत. आम्ही आमची मूल्य जपत योग्य दिशेने काम करत राहणार आहोत. सध्या आमचं हेच लक्ष्य आहे,” असं ट्रूडो म्हणाले.

विश्वास ठेवा

कॅनडामधील न्यायालयीन कारभार फार कठोर आहे. कॅनडामध्ये सुरक्षा आणि कॅनडियन नागिरकांच्या सुक्षेसंदर्भात आम्ही फार गंभीर आहोत. हे नागरिक मूळचे कॅनडियन असो किंवा परदेशातून इथे स्थायिक झालेले असोत त्यांच्या सुरक्षेबरोबर तडजोड केली जात नाही, असं ट्रूडो म्हणाले. कॅनडा हा फार सुरक्षित देश आहे, असं मी सर्वांना सांगू इच्छितो.

मी लोकांना शांतता बाळगण्याचं आणि आमच्या संस्था, कायदेशीर संस्था आणि न्याय व्यवस्थेबद्दल सन्मान आणि विश्वास कायम ठेवावा असं आवाहन करतो असंही ट्रूडो म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *