कोल्हापूर जिल्हा सहकारी मुद्रण व प्रकाशन संस्थेची 62 वी वार्षिक साधारण सभा उत्साहात
शिरोळ/ प्रतिनिधी:
(local news) कोल्हापूर जिल्हा सहकारी मुद्रण व प्रकाशन संस्थेची 62 वी वार्षिक साधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेमध्ये सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. श्री दत्त साखर कारखान्याच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील हे होते.
प्रारंभी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना गणपतराव पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी मुद्रण व प्रकाशन संस्था तसेच संस्थेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या इंद्रधनुष्य मासिकाच्या प्रगतीचा आढावा घेतला. श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार व इंद्रधनुष्यचे सल्लागार प्रा. अशोक दास यांनी मनोगते व्यक्त केली. विषय पत्रिकेचे वाचन व सभेचे कामकाज संस्थेचे सचिव दिगंबर कुडचे यांनी पार पाडले. सभासदांनी सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी दिली.
गणपतराव पाटील यांना ‘समाज भूषण’, ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच कारखान्याच्या क्षारपड मुक्तीच्या दत्त पॅटर्नला केंद्र सरकारचे ‘कॉपीराईट’ अर्थात ‘पेटंट’ मिळाल्याबद्दल व सहवीज निर्मिती प्रकल्पास आणि शोधनिबंधास पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपतराव पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. (local news)
स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संपादक प्रा. मोहन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सहसंपादक संजय सुतार यांनी केले, तर आभार व्हाईस चेअरमन पंडित काळे यांनी मानले. दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, मान्यवर, श्री दत्त कारखाना व दत्त समूहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.