संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा मोठा निर्णय

तिन्ही सैन्यदलांतील महिलांना एकसमान मातृत्व, बालसंगोपन आणि दत्तक रजा (leave) देण्याच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे रजेबाबत अधिकारी व कर्मचारी असा भेद राहणार नाही. सशस्त्र दलांतील सर्व पदांवर महिलांचा सर्वसमावेशक सहभाग सुनिश्चित करण्याच्या सिंह यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने रविवारी नमूद केले.
संरक्षणमंत्र्यांनी सशस्त्र दल, नौदल आणि वायूदलातील महिला सैनिकांना त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने मातृत्व, बालसंगोपन आणि दत्तक रजा मंजूर करण्यासाठी नियम लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सैन्यातील माहिलांना आपल्या व्यावसायिक व कौटुंबिक जीवनात समतोल राखण्यात मदत होईल व त्यांच्या कामात अधिक सुधारणा होईल, असे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.
सध्या महिला अधिकाऱ्यांना दोन मुलांसाठी पूर्ण पगारासह प्रत्येकी १८० दिवसांची प्रसूती रजा (leave) मिळते, तर एकूण सेवाकालावधीत (मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेपर्यंत) ३६० दिवसांची बालसंगोपन रजा मंजूर केली जाते. याशिवाय एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला दत्तक घेताना दत्तक तारखेनंतर १८० दिवसांची रजा मंजूर केली जाते. नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर अधिकारी किंवा इतर कोणत्याही रँकच्या महिला सैनिकांना एकसमान रजा लागू होईल.