सर्वात मोठी बँक असलेल्या ग्राहकांना दिवाळीआधीच मोठा धक्का
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीच्या ग्राहकांची (customers) संख्या देशात लक्षणीय आहे. एचडीएफएसी बँकेने दिवाळीपूर्वी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. HDFC बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ निवडलेल्या कर्ज कालावधीच्या कर्जासाठी करण्यात आली आहे. MCLR वाढल्यामुळे वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे. पर्यायाने ग्राहक घेत असलेल्या लोन इंट्रेस्टवर याचा परिणाम होईल. नवीन दर 7 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या पाच वेळा पतधोरण आढाव्यात रेपो दर कायम ठेवले आहे. असे असतानाही बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसी लिमिटेडचे स्वतःमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर, बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन कमी झाले आहे.
सुधारित व्याजदरांतर्गत, एक दिवसाचा MCLR सध्याच्या 8.60% होता तो आता 8.65% झाला आहे. तर 3 वर्षांच्या कालावधीसाठी MCLR 9.25% वरून 9.30% झाला आहे. असे असले तरी एका वर्षाच्या कार्यकाळासाठी MCLR 9.20% वर कायम ठेवण्यात आल्याची माहिती बॅंकेकडून देण्यात आली आहे.
MCLR म्हणजे काय?
MCLR हा प्रत्यक्षात किमान व्याजदर आहे. या ठराविक रेटच्या खाली कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. बँकांना त्यांचा रात्रभर, एक महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष आणि दोन वर्षांचा MCLR दर महिन्याला जाहीर करणे बंधनकारक असते. MCLR वाढल्याचा परिणाम ग्राहकांच्या (customers) खिशाला बसतो. एमसीएलआर वाढल्याने आता गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारख्या किरकोळ किमतीशी संबंधित कर्जावरील व्याजदर वाढतील. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.