महिला डॉक्टरवर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

मुंबईत एका महिला डॉक्टरवर बलात्कार (rape) केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळत असताना आरोपी आणि पीडित महिलेची ओळख झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घरगुती कारणांमुळे महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. दरम्यान, पीडित महिला आणि तिचा पती यांच्यामधील वाद मिटवून देतो, असे सांगून आरोपीने पीडितेला आपल्या विश्वासात घेतले. यानंतर २० ऑगस्ट रोजी आरोपीने पीडितेला एका क्लबमध्ये बोलावले.

क्लबमध्ये गेल्यानंतर आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली. तसेच, आरोपीने पीडितेला कारमधून आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार (rape) केला. यादरम्यान आरोपीने पीडितेचे अश्लिल व्हिडीओ देखील काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच, या व्हिडीओचा आधार घेऊन आरोपीने महिलेकडून पैसे सुद्धा उकळले.

दरम्यान, दिवसेंदिवस आरोपीचे कृत्य वाढत असल्याने पीडित महिलेने अखेर गावदेवी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *