सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ क्षेत्रात देशात येणार मोठी गुंतवणूक

जर तुम्ही टेक आणि आयटी क्षेत्रात नोकरी (job) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, या क्षेत्रात 50,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. खरं तर, सरकारने IT हार्डवेअरसाठी नवीन प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत Dell, HP, Flextronics आणि Foxconn सह 27 कंपन्यांना मान्यता दिली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. सरकार IT हार्डवेअर कंपन्यांना प्रोत्साहन देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासह केंद्र सरकार देशात मॅन्युफॅक्चरिंगची स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, यापैकी 23 कंपन्या तात्काळ उत्पादनाचे काम सुरू करण्यास तयार आहेत, तर आणखी चार कंपन्या येत्या 90 दिवसांत उत्पादनाचे काम सुरू करतील. सरकारच्या या निर्णयामुळे उत्पादन क्षेत्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, तर 50 हजार लोकांना थेट आणि 1.5 लाख लोकांना अप्रत्यक्ष नोकऱ्या (job) मिळण्याची अपेक्षा आहे.
40 कंपन्यांनी अर्ज केले होते
या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी डेल, एचपी, फॉक्सकॉन आणि लेनोवोसह एकूण 40 कंपन्यांनी पीएलआय योजनेसाठी अर्ज केले होते. योजनेअंतर्गत लॅपटॉप, टॅब्लेट, सर्व्हर आणि 4.65 लाख कोटी रुपयांचे उत्पादन समाविष्ट आहेत.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ज्या कंपन्यांना अद्याप आयटी हार्डवेअर पीएलआय योजनेंतर्गत मान्यता मिळालेली नाही, त्यांचे मूल्यांकन केले जात आहे. लवकरच या कंपन्यांचा या योजनेत समावेश होईल, अशी अपेक्षा आहे.
सरकारने मे महिन्यात आयटी हार्डवेअर पीएलआय योजना सुरू केली होती, ज्यासाठी 17 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत, लॅपटॉप, सर्व्हर आणि अल्ट्रा-स्मॉल फॉर्म फॅक्टर उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
यामुळे 3.5 लाख कोटी रुपयांचे उत्पादन सुरू होईल आणि 2 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा अंदाज आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उद्योगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.