अनुष्का, अथिया स्क्रीनवर दिसताच हरभजनने केलेल्या ‘त्या’ कमेंटमुळे वाद!

(sports news) रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत 10 सामने जिंकलेल्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यातच मानहानिकारक पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यादरम्यान केलेल्या एका टिप्पणीमुळे वादात सापडला आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नीबाबत हरभजनने केलेल्या वक्तव्यामुळे त्याने माफी मागावी अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स आले होते. त्यात विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा समावेश होता. दोघेही विराट कोहली आणि केएल राहुल यांना सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी समालोचन करताना हरबजान सिंगने अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीवर अशी कमेंट केली होती, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर लोकांनी हरभजन सिंगला तत्काळ माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.

नेमकं काय झालं?

भारतीय डावाच्या 18व्या षटकात हरभजन सिंग हिंदीत कॉमेंट्री करत होता. यादरम्यान अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी लाईव्ह टीव्हीवर बोलताना दिसल्या, त्यांना पाहून हरभजन सिंग म्हणाला, “मला वाटतंय की चर्चा क्रिकेटवर व्हायला हवी. आणि मी विचार करत होतो की आपण क्रिकेटबद्दल बोलत आहोत की चित्रपटांबद्दल. कारण मला माहित नाही की क्रिकेटबद्दल किती समजत असेल.” (sports news)

हरभजन सिंगच्या या वक्तव्यामुळे युजर्सनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. हरभजचा व्हिडीओ शेअर करताना एका चाहत्याने, ‘हरभजन सिंग, महिलांना क्रिकेट समजत नाही हे तुम्हाला म्हणायचे आहे? कृपया लगेच माफी मागावी, असे म्हटलं आहे. दुसऱ्या एका युजरने “हिंदी समालोचकांनी अनुष्का शर्मा यांच्या क्रिकेटबद्दलच्या समजुतीची उघडपणे खिल्ली उडवली. हम कब सुधरेंगे भाई, ती फक्त अनुष्का नाही, विराट कोहलीची पत्नी आहे, ज्याने नुकताच इतिहास रचला आहे आणि इतके लोक पाहताना कोणाची चेष्टा करत आहात, हे हास्यास्पद आहे,” असं म्हटलं आहे.

दरम्यान, भारताच्या 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने हेडच्या 120 चेंडूत चार षटकार आणि 15 चौकारांसह 137 धावा केल्या. तसेच मार्नस लॅबुशेन (110 चेंडूत नाबाद 58, चार चौकार) आणि चौथ्या विकेटसाठी 192 धावांच्या भागीदारीसह 43 षटकात 4 गडी गमावत 241 धावा करत विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *